विद्यमान वीज देयक भरून सामान्यांचे आर्थिक गणीत बिघडले असतांनाच महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे आणखी वाढीव वीज दरवाढीची याचिका दाखल केली आहे. या दरवाढीने चिंता वाढली असतांनाच ‘गो ग्रीन’च्या माध्यमातून छापील वीज देयकाऐवजी ई- मेल व भ्रमनध्वनीवर एसएमएसचा पर्याय स्विकारून ग्राहक वर्षाला १२० रुपयांची बचत करू शकतात. उपराजधानीतील ११ हजार ग्राहक महावितरणच्या या योजनेचा लाभ घेत आहे.
हेही वाचा >>>नागपूर: भारत वि.ऑस्ट्रेलिया सामना, नागपूरमध्ये थेट मैदानातूनच सट्टा खेळणाऱ्या चौघांना अटक
महावितरणकडून छापील देयकाऐवजी ई- मेल व भ्रमनध्वनीवर एसएमएसचा पर्याय स्विकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीज देयक १० रुपये सवलत दिली जाते. त्यामुळे ग्राहकाला वर्षभराच्या १२ देयकांवर १२० रुपयांचा लाभ मिळू शकतो. नागपूर परिमंडळात १६ हजार २४९ ग्राहक या सवलतीचा लाभ घेत आहे. त्यात नागपूर शहरातील ११ हजार ३३२, नागपूर ग्रामीण २ हजार ४५५, वर्धा मंडळ २ हजार ४६२ ग्राहकांचा समावेश आहे. जे ग्राहक छापील देयकाच्या एवजी गो- ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, त्यांना देयक महावितरणकडून ई- मेल व भ्रमनध्वनीवर एसएमएसद्वारे दिले जाते. या ग्राहकांना प्रती देयक १० रुपये सवलत मिळते. गो- ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो- ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे.