वर्धा : कायद्यातील पळवाटा शोधून चोरी साधणारे असतात. तसेच कायद्ये न जुमानता बेधडक चोऱ्या करीत वर शिरजोरी करणारे पण पाहायला मिळतात. वीजचोरी हा अश्यांचा आवडता प्रांत. आकडा टाकून वीज चोरणाऱ्यांचे प्रताप गावोगावी दिसतात. पण आता त्यावर ताण करणारे चोरीचे प्रकार उघडकीस आले आहे. ते पाहून वीज कंपनीचे अधिकारी पण स्तब्ध झाल्याचे दिसून आले आहे.
वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने मोठी मोहीम राबविली. त्यात धक्कादायक प्रकार उजेडात आले. तारांवार आकडा टाकून वीज चोरणारे आहेच. काहींनी थेट मिटरमध्ये छेडछाड केली. मिटरच बंद पाडले. काही रिमोट कंट्रोल माध्यमातून मिटर बंद करणारे बहाद्दर दिसले. मिटरमध्ये छिद्र पाडणारे तसेच मिटरचा वेग कमी करणारे आहेच. मिटरची गती कमी करीत अप्रत्यक्ष वीज चोरी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक दिसून आले.
हे असे नवनवे प्रकार पाहून वीज कंपनी अधिकाऱ्यांनी सर्वच मिटरची कसून तपासणी सूरू केली आहे. सदोष मिटर तसेच सरासरी वीज बिल असणारे त्यात प्रामुख्याने आहेत. थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत झालेले तसेच सवलत देऊनही अभय योजनेत सहभागी नं झालेल्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करणे सूरू झाले आहे.
विजचोरीचा अन्य विपरीत परिणाम आहेच. अनधिकृत विद्युतभारामुळे वीज वाहिन्या व रोहित्रवार अधिक ताण येतो. परिणामी रोहित्र निकामी होते. शॉर्ट सर्किट होत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडतात. महावितरणला त्याचा आर्थिक फटका बसतोच पण नियमित बील भरणाऱ्या ग्राहकांना नाहक मनस्ताप होतो. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान झालेल्या तपासणीत झालेल्या वीज चोऱ्या मोठा आर्थिक फटका देणाऱ्या ठरल्याचे कंपनीच्या प्रसिद्धी विभागाकडून सांगण्यात आले.
१ हजार २२५ चोरीच्या घटना आहेत. त्यामुळे कंपनीस १ कोटी ९३ लाख ११ हजार रुपयाचा झटका बसला. १ लाख ३३ हजार ४८९ युनिटची ही वीज चोरी आहे. कंपनीने या पार्श्वभूमीवर एक आवाहन केले आहे. नागरिकांनी अधिकृत वीज मिटर घेऊनच विजेचा वापर करावा. वापरलेल्या विजेच्या बिलाचा नियमित भरणा करावा. वीज चोरीमुळे पुरवठा खंडीत होत असल्याने प्रामाणिक ग्राहक संतप्त होतात व त्यांच्या रोषाला अधिकारी व कर्मचारी यांना सामोरे जावे लागते, असे नमूद करण्यात आले आहे.