नागपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु, आता महावितरणकडून या मीटरचे नाव टीओडी (टाईम ऑफ डे) असे बदलवून सर्व ग्राहकांकडे सक्तीने लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे, महावितरण हे मीटर लावण्याबाबत लेखी आदेश काढायला मात्र घाबरत आहे.

महावितरणने राज्यातील २.४१ कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध खासगी कंपन्यांना कंत्राट दिले होते. परंतु, राज्यभरातील ग्राहक संघटना, कामगार संघटनांसह नागरिकांकडून विरोध वाढल्यावर तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मीटर घरगुती ग्राहकांकडे लावणार नसल्याची घोषणा केली होती. आता मुख्यमंत्री व ऊर्जामंत्रीपदी फडणवीस आहेत. तरीही हे मीटर लावले जात आहेत.

फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपुरातही हे मीटर ग्राहकांकडे सक्तीने लावले जात आहेत. विशेष म्हणजे, या मीटरबाबत नागरिकांमध्ये संताप असल्याने महावितरण मीटर लावण्याचे आदेश काढत नाही. खुद्द फडणवीस यांनी मीटर घरगुती ग्राहकांकडे लावणार नसल्याची घोषणा विधानसभेत केली असल्याने महावितरण लेखी आदेश काढण्यास घाबरत असल्याचा आरोप आता होत आहे. मध्यंतरी महावितरणने राज्यभरातील स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात सगळ्याच ग्राहकांकडे हे मीटर लावणे सक्तीचे असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात आदेशही काढले नाहीत.

ग्राहकांकडून मीटर नाकारणारे पत्र महावितरणकडे

नागपूरसह राज्यातील अनेक भागातून महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे स्मार्ट मीटर नको असल्याचे अर्ज ग्राहकांकडून दिले जात आहेत. या पत्रांचे करायचे काय, हा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

महावितरणचे स्वतंत्र संचालक काय म्हणतात?

महावितरणकडून राज्यात ‘टीओडी’ मीटर लावले जात आहेत. परंतु, त्याबाबत सक्ती केली जात नाही. संबंधित अधिकाऱ्याकडून अधिक माहिती घेऊन बोलेल, असे मत महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केले.

स्मार्ट प्रीपेड मीटर काय आहे ?

सध्या महावितरणद्वारे वीज ग्राहकांकडे स्मार्ट वीज मीटर लागले आहे. या मीटरमध्ये महिन्याला किती वीज वापरली त्याचे नियमित वाचन दर महिन्याला वीज कंपनीद्वारे नियुक्त कायम वा कंत्राटी कर्मचारी करतात. त्या आधारावर ग्राहकाला देयक पाठवले जाते. स्मार्ट प्रीपेड मीटर ‘मोबाइल’ रिचार्जप्रमाणे काम करणार आहे. जितके पैसे भरले तितकीच वीज ग्राहकांना वापरता येईल. या मीटरमध्ये आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला क्षणात त्याच्या भ्रमणध्वनीवर ॲपच्या माध्यमातून बघता येईल. सध्या महावितरण प्रीपेडच्या ऐवजी पोस्टपेड म्हणजे पूर्वीप्रमाणे देयक ग्राहकांना देणार आहे. परंतु या मीटरमध्ये कधीही प्रीपेडमध्ये परावर्तित करण्याची सोय आहे.