बुलढाणा : महावितरण ग्राहकांना अधूनमधून लहान मध्यम धक्के देत राहते. मात्र, यावेळी जिल्ह्यातील ग्राहकांनी महावितरणलाच तब्बल २१२३ कोटी रुपये थकबाकीचा मोठा ‘शॉक’ दिल्याचे चित्र आहे. यामुळे नूतन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या समक्ष महा वसुलीचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. बुलढाणा महावितरणच्या अधीक्षक अभियंता पदाची सूत्रे सुरेंद्र कटके यांनी स्वीकारली आहे. आज प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना थकबाकीचा तपशील मांडला. जिल्ह्यात घरगुती, वाणिज्य व औद्योगिक मिळून ४ लाख ८६ हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे ७५ कोटी रुपये वीज बिलपोटी थकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या पतीसाठी पत्नीचा संघर्ष!

रस्त्यावरील दिव्यांचे (स्ट्रीट लाईट) १८२६ ग्राहक असून संबंधित संस्थांकडे २४४ कोटींची थकबाकी आहे. पाणीपुरवठा योजनेची ग्राहकसंख्या १४६३ इतकी असून ८६.४१ कोटी थकीत आहे. या ग्राहकांची एकूण संख्या ६. ५६ लाख इतकी असून थकबाकीची गोळाबेरीज २१२३ कोटीपर्यंत गेली असल्याचे कटके यांनी सांगितले. दरम्यान, ३१ मार्च पर्यंत वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध लवकरच कडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात विजतोडणी मोहीम हाती घेण्यात आली असून ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांकडील थकबाकी मोठी असल्याचे सांगून कास्तकारांनी ७० टक्के बिल भरले तरी त्यांचे पूर्ण बिल माफ करण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या वसुलीचा विनियोग कृषी क्षेत्रासाठी असलेल्या योजनावरच होतो, ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी बिल भरणा करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी या चर्चे अंती केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran outstanding power dues at rs 2123 crore in buldhana district scm 61 zws