अकोला : महावितरणच्या ‘लकी डिजिटल’ योजनेतील एका अटीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. ग्राहकांना ऑनलाइन वीज देयकाचा भरणा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या ग्राहकांना मोबाइल, स्मार्ट वॉचचे वाटप केले जाणार आहे. मात्र, योजनेच्या पात्रतेसाठी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही, अशी अजब अट टाकली. वर्षभर देयक न भरणाऱ्या ग्राहकांना महावितरण बक्षिस देऊन सन्मान करणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम आहे.
थकबाकीचा डोंगर वाढल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा वणवण भटकंती करीत असल्याचे दिसून येते. ऑनलाइन वीज देयक भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेच्या पात्रतेसाठी पहिल्याच अटीमध्ये महावितरणच्या यंत्रणेने मोठा गोंधळ केला. ही योजना महावितरणच्या अशा लघू दाब चालू वीज ग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही, अशी अट टाकली आहे.
या योजनेच्या प्रसार, प्रचार साहित्यासह महावितरणच्या प्रसिद्धी पत्रकात देखील या अजब अटीचा उल्लेख आहे. याचा अर्थ वर्षभरात एकदाची वीज देयक न भरणारे ग्राहक योजनेंतर्गत बक्षित मिळवण्यास पात्र ठरतील. मूळात वर्षभर वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा यंत्रणेनेच थकबाकीदार म्हणून कापला असेल. त्यामुळे ते चालू ग्राहक राहणार नाही. या विचित्र अटीचा विचार केल्यास राज्यातील एकही ग्राहक योजनेसाठी पात्र ठरणार नाही. या योजनेंतर्गत एप्रिल, मे व जून महिन्यात प्रत्येकी तीन हजार २५५ ग्राहकांना मोबाइल व स्मार्ट वॉच देण्याचे नियोजन आहे. मात्र, अटीतील गोंधळामुळे लाभार्थी कसे मिळणार? की थकबाकीदारांचाच महावितरण सन्मान करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अटीमध्ये काही चूक झाली असावी
त्या वर्षभरात ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नसलेले ग्राहक योजनेसाठी अपेक्षित आहेत. अटीमध्ये काही चूक झाली असावी, असे महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी सांगितले.
नियमित ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय
१ जानेवारी ते ३१ मेदरम्यान वीज देयकांचा ऑनलाइन भरणा करणारे ग्राहक योजनेसाठी पात्र ठरतील. गेल्या अनेक वर्षांपासून वीज देयकांचा ऑनलाइन भरणा करणाऱ्या ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे त्या ग्राहकांमध्ये अन्यायाची भावना आहे.