अकोला : थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी थकबाकीवरील व्याज व विलंब आकाराच्या संपूर्ण माफीसह पुनर्जोडणीची अभय योजना महावितरणकडून राबवली जात आहे. मात्र, ७८ टक्के थकबाकीदारांनी अभय योजनेला ठेंगा दाखवला. केवळ २२ टक्के थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेऊन घरे पुन्हा प्रकाशमान केली. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असल्यावरही काही ठिकाणी गैर मार्गाने विजेचा वापर केला जातो. महावितरणची यंत्रणाच तो मार्ग दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

वीजबिल न भरल्यामुळे ३१ मार्च २०२४ पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने १ सप्टेंबर २०२४ ला अभय योजना सुरू केली. मुळ थकबाकी भरल्यानंतर व्याज आणि विलंब आकारात संपूर्ण माफी शिवाय मुळ थकबाकीची ३० टक्के रक्कम एकरकमी भरल्यास उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सुविधा‚ घरगुती व व्यावसायिक ग्राहकांनी एकरकमी थकीत बिल भरल्यास त्यांना १० टक्के अतिरिक्त सवलत आणि उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के अतिरिक्त सवलत आदी योजनेत लागू केले.

अकोला परिमंडळात योजनेंतर्गत ५९ हजार ९८१ थकबाकीदार ग्राहक पात्र होते. त्यातील केवळ १३ हजार ४३९ थकबाकीदार ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला. त्यापैकी १० हजार ३२६ ग्राहकांची घरे पुन्हा प्रकाशमान झाली असून तीन हजार ११३ ग्राहक पुनर्जोडणी न घेता फक्त थकबाकीतून मुक्त झाले. पुनर्जोडणी घेणाऱ्या १० हजार ३२६ मध्ये अकोला दोन हजार ६३८, बुलढाणा पाच हजार ०२० आणि वाशीम जिल्ह्यातील दोन हजार ६६८ ग्राहकांचा समावेश आहे.

४६ हजारावर १५२ कोटींची थकबाकी

परिमंडळांतर्गत अद्याप ४६ हजार ५४२ ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम १० हजार रुपयापेक्षा जास्त असून ते अभय योजनेत पात्र आहे़त. त्यांच्याकडे १५२ कोटी रुपयाचे वीजबिल थकल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला. त्यात अकोला जिल्ह्यातील १७ हजार ६४ ग्राहक असून त्यांच्याकडे ५२ कोटी, बुलढाणा जिल्ह्यात १७ हजार २३४ ग्राहकांकडे ६२ कोटी आणि वाशीम जिल्ह्यातील १२ हजार २४४ ग्राहकांकडे ३७ कोटी थकीत आहेत. मार्च महिन्यानंतर महावितरणकडून कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, थकबाकीदार ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.

Story img Loader