गडचिरोली : राज्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. परंतु महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप न ठरल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. आज, उद्या म्हणून दहा दिवस झाले, एवढ्या कमी कालावधीत आम्ही प्रचार कसा करायचा, असा अस्वस्थ प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारल्या जात आहे.
हेही वाचा >>> “मी लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम,” अमर काळेंचा निर्धार
गडचिरोली-चिमूर भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने राज्यातील सर्वात मोठे लोकसभा क्षेत्र आहे. सोबतच नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे येथील काही मतदान केंद्र अतिसंवेदनशील वर्गात मोडतात. त्यामुळे उमेदवार व राजकीय कार्यकर्त्यांचा प्रचारादरम्यान कस लागतो. अशात लोकसभेसाठी येथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलरोजी मतदान होणार आहे. निवडणुकीला अवघे २७ दिवस शिल्लक असताना अद्याप उमेदवार घोषित झालेले नाही. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. उमेदवाराचे नाव उद्या घोषित होणार म्हणून दहा दिवस लोटले परंतु निर्णय न झाल्याने कार्यकर्ते हतबल झाले आहे.
हेही वाचा >>> विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर? सस्पेन्स कायम; तेली समाजापाठोपाठ कुणबी समाजाचाही इशारा
नेत्यांना विचारणा केल्यास त्यांच्याकडेही उत्तर नसल्याने काही कळायला मार्ग नाही. अशी स्थिती चिमूरपासून गडचिरोलीपर्यंत दिसून येत आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि डॉ. मिलिंद नरोटे यांच्यात पेच अडकला आहे. तर महाविकासआघाडीत काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नामदेव उसेंडी यांची नावे आघाडीवर आहे. बुधवारी किरसान यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा होती. परंतु गुरुवारी उशिरापर्यंत अधिकृत यादी प्रकाशित न झाल्याने दिल्लीला गेलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी परतीचा मार्ग धरला. तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा नेत्यांचा आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असा दावा कायम आहे. परंतु नाव निश्चित झाले नाही. त्यामुळे महायुतीत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज भरायला केवळ सहा दिवस शिल्लक असल्याने एवढ्या कमी वेळात प्रचार कसा करणार यासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात आहे.
पहिल्या फळीतील नेतेही अनभिज्ञ
उमेदवार कोण, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू असताना किमान दोन्ही पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांना तरी काही माहिती असेल म्हणून कार्यकर्ते दररोज विचारणा करीत आहेत. परंतु त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. मागील दहा दिवसात या नेत्यांनी दोनदा दिल्लीवारी केली. पण त्यांनाही उमेदवाराचे नाव कळलेले नाही. त्यामुळे ते देखील अस्वस्थ आहेत.