यवतमाळ : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र या मतदारसंघात अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह त्यांचे समर्थक संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना (शिंदे गटा)च्या भावना गवळी खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार मुख्यमंत्री शिंदे हेच ठरवतील असे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. मात्र, विद्यमान खासदारांऐवजी विजयाची खात्री असलेला अन्य उमेदवार द्यावा, अशी भाजपची छुपी अट असल्याची विश्वसनीय माहिती आहे. भाजपच्या या अटीमुळे येथील उमेदवाराची घोषणा रखडल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा…माजी आमदार अभिजीत अडसूळ म्हणतात’, ‘राणा दाम्‍पत्‍याला भाजपच्या नेत्यांनी गप्‍प बसवावे’

भावना गवळी यांना डावलून विजयाची खात्री असलेला शिंदे गटाकडे दुसरा उमेदवार मंत्री संजय राठोड हेच आहेत. मात्र संजय राठोड लोकसभेत जाण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे उमेदवारी भावना गवळी यांना द्या, निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आता शिंदे गटात बोलले जात आहे. त्यामुळे सोमवार सकाळपर्यंत येथील उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतही उमेदवारीवर अद्याप एकमत झालेले दिसत नाही. शिवसेना फुटण्यापूर्वी ही जागा शिवसेना (उबाठा)कडे होती. त्यामुळे या जागेवर शिवसेना (उबाठा) ने दावा सांगितला आहे. शिवसेना उबाठाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांचे नाव पुढे आले आहे. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या चार सभाही मतदारसंघात गेल्या आठवड्यात झाल्या. मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप याबाबत स्पष्ट कौल न आल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीचेही घोडे अडले आहे.

हेही वाचा…‘पिंक बूथ’ केंद्र: लोकसभा निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य

वंचित बहुतजन आघाडीचेही अद्याप महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत काहीही ठरले नाही. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितचा उमेदवार राहणार आहे की नाही, हेही स्पष्ट नाही. येथे वंचितचा उमेदवार रिंगणात राहिल्यास महायुतीला ही निवडणूक सोपी जाणार आहे. त्यामुळे महायुतीकडूनही वंचितच्या निर्णयाची प्रतीक्षा सुरू असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…“आपल्याला विरोधकांची  मते कमी करायची आहेत आणि….” काय म्हणाले गडकरी?

महायुतीत शिवसेना शिंदे गटाने भावना गवळी यांना उमेदवारी देण्यास भाजपचा छुपा विरोध आहे. तर मंत्री संजय राठोड निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे मतदासंघातील जातीय समीरकणांवर महाविकास आघाडीला टक्कर देवू शकणाऱ्या सहकार क्षेत्रातील एका युवा नेत्याचे नाव भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून पुढे आले आहे. घरात वडिलांच्या रूपाने यापूर्वी सहा ते सात वेळा खासदारकी अनुभवलेल्या आणि स्वत: तब्बल १० वर्षे जिल्हा बँकेचा डोलारा सांभाळणाऱ्या या युवा नेत्यास भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षाकडून उमेदवारीबाबत विचारणा झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे महायुती ‘तुला न मला…’ या उक्तीने ऐनवेळी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून भाकरी पालटणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. असे झाले तर जिल्ह्यातील कुणबी, मराठा, पाटील समाजाची मनीषा पूर्ण होवून, महाविकास आघाडीसमोर मात्र आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.