बुलढाणा : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे जय्यत तयारी सुरू असून जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. युतीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात युतीमध्ये जागा वाटप जवळपास ठरल्यात जमा आहे. महाविकास आघाडीमध्ये मात्र जागा वाटप वरुन अजूनही पेच कायम असून जागेवरून ओढाताण सुरू आहे. तसेच उमेदवारीचा तीढा कायम असल्याचे वृत्त आहे.

मागील २०१९ च्या लढतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकसंघ होती. तसेच भाजप शिवसेना अशी युती होती तर राष्ट्रवादी आघाडी मध्ये होती. त्या निवडणुकीत भाजपाने चिखली, जळगाव आणि खामगाव मध्ये बाजी मारली होती. शिवसेना बुलढाणा आणि मेहकर मध्ये विजयी झाली.

काँग्रेसला एकमेव मलकापूर तर राष्ट्रवादी सिंदखेड राजामध्ये यश मिळाले. आता सेना आणि राष्ट्रवादी मध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे वाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहे. लोकसभेत विदर्भात काँग्रेसला मोठे यश मिळाल्याने विदर्भातील जास्तीत जास्त जागा घेण्याचे काँग्रेसचे धोरण आहे.

हेही वाचा >>> नागपूर: विद्यार्थ्यांनो; विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर…

शिवसेना ठाकरे गटाने बुलढाणा, मेहकर आणि सिंदखेड राजा या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसने बुलढाणा, खामगाव, मलकापूर, चिखली आणि जळगाव जामोद या चार मतदारसंघाची मागणी केली आहे. सेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणासाठी ठाकरे गट आणि काँग्रेस हे दोन्ही मित्र पक्ष आग्रही असल्याचे चित्र आहे.

यामुळे सेनेने दवाबाचे राजकारण म्हणून चिखली मतदारसंघाची देखील मागणी केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने सिंदखेड राजा आणि जळगाव जामोद मतदारसंघावर दावा केला आहे. जळगाव मतदारसंघातून काँग्रेसतर्फे लढण्यास इच्छुकांची संख्या वीस इतकी आहे. युतीत उमेदवार जवळपास ठरले असताना आघाडीमध्ये मात्र चिखलीचा अपवाद वगळता उमेदवारी साठी तीव्र चुरस असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> संघाच्या विजयादशमी उत्सवाची तयारी सुरू; सरसंघचालकांचे यंदाचे भाषण महत्त्वाचे का ? 

बुलढाणा जिल्ह्यातील सात पैकी तब्बल सहा आमदार महायुतीचे आहेत. राष्ट्रवादीमध्येही फूट पडल्यावर आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादा सोबत जाण्याला पसंती दिली. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेला ठोस मदत मिळावी यासाठी शिंगणे यांनी सत्ताधारी महायुती आणि अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांची संख्या सहा झाली आहे. मलकापूर मतदारसंघात राजेश एकडे (काँग्रेस) यांच्या रूपाने आघाडीचा एकमेव आमदार आहे.