नागपूर : लोकसभा निवडणुकीची तयारी एकवर्षाआधीपासून सुरू करणाऱ्या महायुती व महाविकास आघाडीत जागा वाटपाला विलंब होत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील नागपूर व रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे सध्यातरी दोन्ही आघाड्यांमधील राजकीय चित्र अधांतरी असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी वर्षभरापासून सुरू केली आहे. विशेषत: भाजप आणि काँग्रेसने ग्रामीण भागात अगदी बुथ, मंडळ आणि तालुका पातळीवर आणि नागपूर शहरात बुथ, ब्लॉक, विधानसभानिहाय तयारी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपूर लोकसभेसाठी उमेदवार निश्चित असल्याचे गृहित धरले आहे. परंतु भाजपच्या पहिल्या यादीत नागपूरसह महाराष्ट्रातील एकाही उमेदवारी घोषणा पक्षाने केली नाही.

जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ रामटेक. येथे विद्यमान खासदार शिवसेना (शिंदेगट) यांचा आहे. पण आता या मतदारसंघावर भाजप दावा करीत आहे. त्यामुळे महायुतीच्या वाटाघाटीत नेमकी कोणाला ही जागा जाईल, हे अनिश्चित आहे. या सर्व बाबींचा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होत आहे. कायम निवडणुकीच्या मूडमध्ये असल्याचे भासवत असलेल्या भाजपला नागपूर आणि रामटेक मतदारसंघात स्पष्ट काय ते सांगता येत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसला नागपूर लोकसभेसाठी सक्षम उमेदवार शोधण्यात कसरत करावी लागत आहे. २०१९ मध्ये ऐनवेळी नाना पटोले यांना नागपुरातून लढवण्यात आले होते. नंतर पटोले पुरेसा वेळ मिळाला नाही, अन्यथा चित्र वेगळे असते असे सर्वत्र सांगत राहिले. याहीवेळी काँग्रेस आयत उमेदवार नागपुरात देणार की नागपुरातील उमेदवार देऊन भाजपासमोर आव्हान उभे करणार याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी पुरेसा मिळावा म्हणून उमेदवाराची घोषणा किमान महिनाभरापूर्वी होणे अपेक्षित असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना वाटते.

हेही वाचा : पुण्यात काँग्रेसमध्ये चौघे इच्छूक, उमेदवारी कोणाला ?

रामटेक लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीच्या वाटावाटी अद्याप संपलेल्या नाहीत. काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरेगट) यांनाही ही जागा हवी आहे. काँग्रेसने या मतदारसंघात एका महिलेसह यापूर्वी लढलेल्या उमेदवाराला संभावित उमेदवार म्हणून निश्चित समोर केले आहे. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा कोणाला जाणार हेच अंतिम होऊ शकले नाही आणि उमदेवाराची यादीला विलंब होत आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील पक्ष नेतृत्वाला कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचाराची स्पष्ट दिशा देता नसल्याचे चित्र आहे.

नागपूरचे उमेदवार ठरलेच आहे. रामटेकच्या उमेदवाराची लवकरच घोषणा होईल. पण आमचे कार्यकर्ते दोन्ही मतदारसंघात कामाला लागले आहेत.

बंटी कुकडे, शहर अध्यक्ष,भाजप, नागपूर

काँग्रेसची निवडणूक तयारी झाली आहे. बुथ, मंडळ समिती स्थापन झाल्या आहेत. रामटेकची जागा मागितली आहे. महाविकास आघाडी एक-दोन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेईल.

राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस, नागपूर

हेही वाचा : अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

उमेदवार तुल्यबळ असेल

पक्ष उमेदवार जाहीर करेल तेव्हा करेल, पण उमेदवार तोडीस तोड असेल. शहर काँग्रेस निवडणुकीसाठी सज्ज आहे.

आ. विकास ठाकरे , शहराध्यक्ष, कॉंग्रेस, नागपूर

Story img Loader