लोकसत्ता टीम
यवतमाळ : राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करणे हे कोणत्याही व्यक्तीचे प्रथम कर्तव्य असते. सध्या निवडणुकीच्या धामधुमीत सर्व पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात इतके व्यस्त आहेत. दरम्यान, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील-महल्ले यांनी मध्यरात्री अपघातानंतर रस्त्यावर पडून असलेल्या जखमी व्यक्तीला तत्काळ मदत करत माणुसकीचा परिचय दिला.
राजश्री पाटील या सोमवारी मध्यरात्री प्रचारसभा आटोपून यवतमाळकडे परत येत होत्या. दारव्हा मार्गावर एक चारचाकी वाहन खांबास धडकल्याने अपघात होवून नेर तालुक्यातील मोझर येथील अक्षय निचत हा तरूण गंभीर जखमी झाला होता. रात्रीची वेळ असल्याने त्याच्या मदतीसाठी कोणीही थांबले नव्हते. हे दृष्य नजरेस पडताच राजश्री पाटील यांनी आपला ताफा थांबवून त्यांनी जखमीला तत्काळ मदतकार्य सुरू केले. तातडीने पोलीस व शासकीय रूग्णालयात संपर्क केला. जखमीला कार्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या वाहनात घेवून तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. तेथे जखमी युवकास दाखल करून त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली.
आणखी वाचा-चंद्रपूर : धक्कादायक! शिपायास कायमस्वरूपी करण्यासाठी दीड लाख मागितले
डॉक्टरांनी जखमी तरूणास तपासून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितल्यानंतर जखमी अक्षयला भेटून त्याची विचारपूस करून राजश्री पाटील पहाटे आपल्या निवासस्थानी पोहोचल्या. मदतीच्या या क्षणांचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे.