गोंदिया : लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या विधानसभा क्षेत्रात लीड मिळेल तिथेच महायुतीतील त्या त्या आमदारास पुन्हा तिकीट देवू, असा इशारा दिला होता. ही निवडणूक तीन पक्ष मिळून लढत असल्यामुळे कोण कुणा इतर पक्षाचे काम करणार की नाही याला उद्देशून हे तंत्र असावे. पण गोंदिया जिल्ह्यात हे फसवे ठरले असल्याची प्रचिती लोकसभेत मिळालेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा क्षेत्रनिहाय जबाबदारी देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोंदियात एक मीटिंग घेवून आघाडीतील आमदारांना कामाला लावले होते. गोंदियात माजी आमदार गोपालदास अग्रवाल आणि विद्यमान अपक्ष आमदार विनोद अग्रवाल, तिरोडा – गोरेगांव येथे आमदार विजय रहांगडाले, तर अर्जुनी मोरगाव येथे माजी आमदार राजकुमार बडोले आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना भाजपचे सुनिल मेंढे यांना विजयी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील या तीन विधानसभांपैकी केवळ तिरोडाचे विजय रहांगडाले व गोंदियाचे गोपालदास अग्रवाल आणि विनोद अग्रवाल यांनीच इमान इतबारे आपली कामगिरी बजावली. तर अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आजी माजी आमदार असूनसुद्धा तब्बल २० हजार मतांनी सुनिल मेंढे मागे पडले.

हेही वाचा – राज्यात आज पावसाचा ‘येलो अलर्ट’, पूर्व मोसमी पावसाची हजेरी

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात प्रशांत पडोळे यांना ९२४५५ मते तर सुनिल मेंढे यांना ७१७९७ मते मिळाली. येथील पडोळे यांना २० हजाराचे मताधिक्य मिळाले. तर गोंदिया जिल्ह्यातील उर्वरित दोन गोंदिया आणि तीरोडा विधानसभेतून पराभूत सुनिल मेंढे यांना सुमारे ४५ हजाराचे मताधिक्य आहे. यात तीरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांच्या मतदारसंघात ८९३८ मताधिक्य सुनिल मेंढे यांना आहे.

हेही वाचा – पहिल्याच निवडणुकीत विजयाला गवसणी! अनुप धोत्रेंनी आजोबा व वडिलांचा राजकीय वारसा जोपासला

पण गोंदिया विधानसभेतील ३५४९९ चे सर्वाधिक मताधिक्य हे कुणाच्या नावे जोडणार हा प्रश्न पुढील विधानसभेचा विचार करताना महायुतीला पडणार कारण येथे मागील २०१९ निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले दोन्ही भाजपचे पराभूत गोपालदास अग्रवाल आणि विजयी अपक्ष विनोद अग्रवाल दोघांनीही महायुतीचे सुनिल मेंढेंकरिता मत मागितले आहे. त्यामुळे याची वाटणी कशी करावी, त्यांनी मेंढेंकरिता केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार का हाही प्रश्नच आहे. गोंदिया जिल्ह्यातील दोन गोंदिया आणि तिरोडा विधानसभाने मताधिक्य दिले. तर उर्वरित अर्जुनी मोरगाव आणि भंडारा जिल्ह्यातील साकोली, तुमसर, भंडारा तिन्ही विधानसभेतून काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांनी ५८ हजारांचे मताधिक्य मिळवून आपला विजय साकार केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti in tiroda and gondia assembly of gondia district while in arjuni morgaon maha vikas aghadi has majority of votes sar 75 ssb