नागपूर : मराठी शाळांची स्थिती अत्यंत बिकट आहे. मात्र, सरकारच्या तुकडय़ांवर आम्ही विसंबून नाही, असे आपण ठणकावून सांगणे आवश्यक आहे. मराठी शाळांवर आलेली अवकळा दूर करण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता मध्यमवर्गीयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्या यजमानपदाखाली अमळनेर येथे होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या सत्कार समारंभात एलकुंचवार बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, डॉ. रवींद्र शोभणे, अरुणा शोभणे आणि साहित्य संघाचे सचिव विलास मानेकर उपस्थित होते.
मराठी शाळांविषयी चिंता व्यक्त करताना एलकुंचवार म्हणाले, ‘‘मराठी शाळा वाचवण्यासाठी मध्यमवर्गीयांची चळवळ उभारणे गरजेचे आहे. या शाळा एक दिवस बंद पडतील आणि त्या जागा व्यावसायिकांच्या ताब्यात जातील. जगभर इंग्रजीचे प्राबल्य आहे म्हणून पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. मात्र, तेथे मुलांची वाढ खुंटते.’’ मराठी शाळा नष्ट करून आपण गरिबांच्या विकासाच्या संधी नष्ट करीत आहोत. तळागाळातील लोकांचा आवाज कुणी ऐकत नाही. त्यामुळे, मध्यमवर्गीयांनीच यासाठी पुढे यावे आणि मराठी शाळा वाचवाव्यात, असे आवाहन एलकुंचवार यांनी केले.समाज सध्या मूल्यहीनतेकडे जात असल्याबद्दल खंत व्यक्त करून डॉ. शोभणे म्हणाले, की मराठी शाळा, दर्जेदार शिक्षण, शालेय व्यवस्थापन आणि शिक्षक भर्ती इत्यादीमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप यावरही विचार होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक आलोणी यांनी केले.
शिक्षण मातृभाषेतूनच हवे : डॉ. बंग
शिक्षण मातृभाषेतच देण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे. शिक्षण मातृभाषेत नसल्याने मुलांचा नैसर्गिक विकास खुंटतो. त्यामुळे शिक्षणाच्या प्रश्नासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करायला हवी, असा सल्ला डॉ. अभय बंग यांनी दिला. पूर्वी, साहित्यिक आणि समाजसेवक या दोघांचे समाजात वजन होते. आज ते विस्थापित झाले आहेत. कारण, केवळ विचार असून चालत नाही तर, त्या शब्दांचे आचरण देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. बंग म्हणाले.
साहित्यिकाने भविष्याचा वेध घ्यावा
डॉ. शोभणे यांच्यामध्ये विनय आणि ऋजुता हे गुण असल्याचे पद्मश्री डॉ. अभय बंग म्हणाले. आजचा समाज कसा आहे याचे दर्शन साहित्यिक घडवू शकतो तर त्या समाजाचे मार्गदर्शन हा सामाजिक कार्यकता करू शकतो. असे झाल्यास शेतकरी आत्महत्या, शिक्षणाची परिस्थिती, पर्यावरणाची हानी याकडे प्रभावीपणे लक्ष वेधता येईल. डॉ. शोभणे यांनी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र आणून समाजाला दिशा देण्याचे काम करावे, असा सल्ला डॉ. बंग यांनी दिला. साहित्यिक व्यक्तीने केवळ भूतकाळ आणि वर्तमान यावर भाष्य न करता भविष्याचा वेध घेणारे साहित्य निर्माण करावे, असेही ते म्हणाले.
मराठी शाळा वाचवण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे आहे, त्यासाठी सरकारची आम्हाला गरज नाही, हे सांगितले पाहिजे. – महेश एलकुंचवार, नाटककार