राज्यात निर्माण झालेली दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या आत्महत्या बघता नाम फाऊंडेशन शेतकऱ्यांना मदत करीत आहे. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रासह समाजातील विविध क्षेत्रातील दानशूर त्यांना सहकार्य करीत आहेत. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी गुरुवारी एक लाख रुपयांचा धनादेश नाम फाऊंडेशनला दिला. राज्यातील एक हजार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यात आपला सक्रि य सहभाग राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत लोक सहभागातून करण्यासाठी नाम फााऊंडेशनच्यावतीने विविध प्रकल्प राबवले जात आहेत. फाऊंडेशनच्या या प्रयत्नांना राज्यातून तसेच देश-विदेशातून मदत मिळत आहे. ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी जाऊन त्या भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली जात आहे. नाम फाऊंडेशनतर्फे राबविणाऱ्या जाणाऱ्या या प्रकल्पाला आता लोकमान्यता मिळत असून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ फाऊंडेशनला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. माजी संमेलनाध्यक्ष म्हणून मिळालेला निधी महेश एलकुंचवार यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी विदर्भात नाम फाऊंडेशनचे काम बघणारे श्याम पेठकर, हरीश इथापे आणि चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महेश एलकुंचवार यांना मिळालेले मानधन त्यांनी नाम फाऊंडेशनला दिले आहे. नाम फाऊंडेशनच्या कार्याचा उल्लेख करताना राज्यातील किमान एक हजार सुखवस्तू परिवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या किमान एक हजार पाल्यांना शिक्षण आणि इतर कार्यासाठी दत्तक घ्यावे, असे आवाहन केले. या मोहिमेत त्यांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Story img Loader