केंद्र सरकारने सेन्सॉर बोर्डाला चित्रपटासंबंधी सर्वाधिकार दिलेले असताना त्यात राजकीय हस्तक्षेप वाढत आहे, त्यामुळे निर्मात्यांना चित्रपट निर्मिती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद या चित्रपटात काय दाखवले आहे, यावरून नाही तर तो राजकीय वाद असल्याचे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले.
‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाच्या निमित्ताने नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘उडता पंजाब’ या चित्रपटात आक्षेपार्ह काहीच नाही. मात्र, त्यावर निर्माण केलेला वाद हा मुळात पंजाबमधील लोकांचा नसून तो राजकीय वाद झाला आहे. या चित्रपटाचे प्रकरण न्यायालयात असले तरी त्यावर निकाल मात्र निर्मात्यांच्या बाजूने येणार आहे. प्रसार माध्यमांनी त्याला पाठिंबा दिला आहे. चित्रपटात काय दाखवावे आणि काय दाखवू नये, हा निर्मात्यांचा आणि दिग्दर्शकांचा अधिकार असतो. सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपट मान्यतेसाठी गेल्यावर ती समिती त्यावर निर्णय घेत असल्यामुळे त्यांना सर्वाधिकार दिले गेले पाहिजे. मात्र, आज तसे होताना दिसत नाही. चित्रपट आक्षेपार्ह आहे की नाही, हे प्रेक्षकांना ठरवू दिले गेले पाहिजे. एखाद्या चित्रपटावर वाद निर्माण झाले की, असे चित्रपट जास्त चालतात आणि कमाई करतात, असे नाही. ‘सैराट’सारखा मराठी चित्रपटाने उच्चांक गाठला आहे. केंद्र सरकारने सेन्सॉर बॉर्डाची निर्मिती करून त्यांना जर अधिकार दिले आहे तर त्यात राजकीय हस्तक्षेप असता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हौशी रंगभूमीबाबत बोलताना ते म्हणाले, व्यावसायिक रंगभूमीकडे कलावंतांची ओढ असली तरी हौशी रंगभूमी मात्र बंद होणार नाही. पुण्यात अनेक नवोदित कलावंत हौशी रंगभूमीवर काम करतात. चित्रपटात किंवा नाटकात काम करताना ती हौस म्हणून केली जाते. प्रायोगिक रंगभूमीला चांगले दिवस आले आहेत. रंगभूमी ही कुठलीही असो त्यात कालांतराने बदल होत असतात. मात्र, ती बंद पडत नाही. एखाद्या कांदबरीवर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, तर कधीही पुस्तक न वाचणारी तरुण पिढी पुस्तक वाचते, असे नाही. चित्रपट आणि नाटक बघण्याची जेवढी आवड आहे तेवढीच पुस्तक वाचनाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अभिनेते राजन भिसे, भाऊ कदम, विद्याधर जोशी यांनी नाटकाबाबत मत व्यक्त केले.

Story img Loader