नागपूर : अवघ्या काही ग्राम वजनाचे विमान आकाशात घिरट्या घालू शकते आणि हे फक्त एरोमोडेलिंगचे प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थीच करू शकतो. हाच विद्यार्थी जेव्हा १३ किलोचे विमान तयार करतो आणि त्यावर साडेचार किलोच्या वजनासह ते विमान एका रिमोटच्या साहाय्याने आकाशात उडवतो, तेव्हा ते खऱ्या विमानाला देखील मात देते. तशी ही कामगिरी पार पाडणे एवढे सोपे नाही, पण नागपूरच्या तरुणाने जागतिक पातळीवर ही कामगिरी पार पाडत त्याची दखल घ्यायला लावली.
एरोमॉडेलिंगच्या जागतिक स्तरावर आयोजित स्पर्धेत नागपुरच्या युवकाने दुसरा क्रमांक पटकावला. अमेरिकेतील सोसायटी ऑफ ॲटोमोटीव्ह इंजिनिअर्स, कॅलीफोर्नियात ही स्पर्धा घेण्यात आली. यात जगातील ६० देशांमधील चमू सहभागी होत्या. त्यात भारताकडून मूळ नागपूरचा असलेला व सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे शिकणाऱ्या महेश्वर ढोणे या विद्यार्थ्याच्या नेतृत्त्वातील चमू सहभागी होती.
‘माव्हेरिक इंडिया’ या चमूमध्ये दहा सदस्य होते आणि त्यांनी जागतिक पातळीवर या स्पर्धेत दूसरा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा डिझाईन, पे लोड कॅपॅसिटी आणि फ्लाईंग एरो परफॉर्मन्सवर आधारित होती. या स्पर्धेत चमूने साडेचार किलो वजनासह विमान रिमोट कंट्रोलने उडवले. विमानाचे वजन १३ किलो होते. नागपूरच्या महेश्वर सुनील ढोणे याने प्रकल्प संचालक, पायलट आणि मुख्य उड्डाण निरीक्षक म्हणून चमूचे नेतृत्त्व केले. २०२३ साली देखील त्याच्या नेतृत्त्वातील चमूने चेन्नई येथे ‘साईज ड्रोन डेव्हलपमेंट चॅलेंज’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवाला होता.
नागपूरच्या तरुणाने कॅलिफोर्नियात उडवले १३ किलोचे विमानhttps://t.co/2jrmCKvB4K#viralvideo #socialmedia pic.twitter.com/S2GVeOPaDN
— LoksattaLive (@LoksattaLive) April 16, 2025
त्यावेळी भारतातील ८१ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चमू यात सहभागी झाल्या होत्या. लहानपणापासूनच एरोमॉडेलिंग स्पर्धेत महेश्वरला रुची होती. नागपूरच्या ‘एरोविजन ग्रुप’चे संस्थापक डॉ. राजेश जोशी यांनी त्याला विमान तयार करण्याचे आणि ते उडवण्याचे प्राथमिक शिक्षण दिले. त्यानंतर महेश्वरची रुची वाढत गेली व त्याने आतापर्यंत सीड ड्रॉपिंग, थ्रीडी, फायटर जेट, डेल्टा, ग्लायडर, वॉक अलाँग ग्लायडर अशी अनेक प्रकारची विमाने तयार केली आहेत. त्याच्या आईवडिलांनी देखील त्याचा हा छंद त्याला लागणाऱ्या प्रत्येक वस्तु पुरवून बळकट केला. आता तो जागतिक पातळीवर यश मिळवून आला आहे. यापुढे सखोल अभ्यास करुन संपूर्ण विमाने भारतात तयार करण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि तो हे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल अशी आशा नागपूरकरना आहे.