नागपूर : पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाचे दर वाढल्यावरही महावितरण मागील चार वर्षांपासून भाड्याने घेत असलेल्या वाहनांचे दर वाढवत नाही, असा आरोप करीत या पुरवठादारांनी निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे आंदोलन झाल्यास राज्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका आहे.
राज्यातील मुंबईचा काही भाग वगळता बहुतांश भागात महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडून ग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांना गस्त घालणे व देखभाल दुरूस्तीसाठी पुरवठादारांकडून भाड्याने वाहने घेत असते. या पुवठादारांच्या माहितीनुसार, राज्यभरातील अधिकाऱ्यांसाठी महावितरण पुरवठादारांकडून टॅक्सी तर वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारे टाॅवर लॅडर व इतर वाहने भाड्याने घेत असते.
हेही वाचा…संघभूमी नागपुरात राहुल गांधींचे संविधान सन्मान संमेलन, राजकीय वर्तुळाचे लक्ष
u
दरम्यान मागील काही वर्षांपासून सतत वाढते इंधन दर, कामगारांच्या वेतनानुसार या पुरवढादारांच्या वाहन भाड्याच्या दरात महावितरणकडून वेळोवेळी वाढ अपेक्षित आहे. परंतु, २७ फेब्रुवारी २०२० नंतर दरात वाढच झाली नाही. महापारेषणकडून मात्र २०२१ मध्ये भाड्याने घेतलेल्या वाहनाच्या दरात सुधारणा करण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या तुलनेत महापारेषणमध्ये पुरवठादारांना किमान तोटा होत नाही. वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसह इतर कामासाठी सध्या अधिकाऱ्यांसाठी सुमारे ७०० टॅक्सी तर ७०० टाॅवर लॅडर महावितरणच्या वापरात आहेत. या सगळ्या वाहनांवरील चालक आणि पुरवठादार असे मिळून सुमारे तीन हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह या वाहनांमुळे चालतो. ते सर्वच आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे महावितरणने दरवाढ न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा पुरवठादारांकडून देण्यात आला आहे.
सध्याचे दर किती?
वर्ग एकच्या अधिकाऱ्यासाठी २४ तास भाड्याच्या वाहनससाठी महिन्याला ३५ हजार ७०० रुपये, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यासाठी २९ हजार ९०० रुपये, टाॅवर लॅडरसाठी ३३ हजार ५०० रुपये , असे दर महावितरणकडून ठरवण्यात आले आहेत. दुसरीकडे महापारेषणमध्ये मात्र वर्ग एकच्या अधिकाऱ्यासाठी महिन्याला ६० हजार रुपये तर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यासाठी ५० हजार रुपये भाडे दिले जाते.
हेही वाचा…जन्मदात्याकडून किळसवाणा प्रकार
महावितरणला वारंवार दर वाढवण्याची विनंती केल्यावरही दर वाढत नाही. आताही दर न वाढवल्यास नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावे लागेल. – योगेश गोमासे, सचिव, नवचेतना टॅक्सी चालक- मालक संघटना, नागपूर.
निवडणूक राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पुरवठादारांनी तूर्तास संयम ठेवावा. वाहन भाडेवाढीचा प्रस्ताव त्यांनी दिला असेल तर वरिष्ठ पातळीवर निश्चितच योग्य कार्यवाही होईल. – भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, नागपूर.