लोकसत्ता टीम
नागपूर : दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर करीत आहे. उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत २०२२-२३ वर्षात घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (राजपत्रित) पदाच्या अंतिम परीक्षेत महाज्योती संस्थेची मैत्रेयी अविनाश जमदाडे मुलींमध्ये राज्यात प्रथम स्थानी आली आहे.
पुण्यात राहणाऱ्या मैत्रेयी जमदाडे हिने सांगितले की, ‘महाज्योती’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेण्याची मला संधी मिळाली. विशेष म्हणजे, एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या अधिकारी पदाच्या परीक्षेत मी प्रथम स्थान मिळाले याचा मला आनंद आहे. मला अधिकारी म्हणून या विभागात काम करण्याची संधी मिळत असल्याचा मला अभिमान असल्याचेही मैत्रेयी जमदाडे हिने सांगितले. महाज्योतीमार्फत मला पुण्यातील नामांकित एच. व्ही. देसाई स्पर्धा प्रशिक्षण केंद्र येथे मोफत मार्गदर्शन मिळाले. तसेच महाज्योतीमार्फत विद्यावेतनातून अभ्यास करण्यास भरीव मदत मला मिळाली. यामुळे मला परीक्षेची तयारी करताना प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा मिळाली. एमपीएससी मुख्य परीक्षेत ११९ गुण व मुलाखतीमध्ये ५५ पैकी ३५ गुण (सर्वाधिक) गुण मिळवता आले असे तिने सांगितले.
आणखी वाचा-अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांना आनंद
राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास (एसबीसी) प्रर्वगातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या मूल्याधिष्ठित प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळाच्या जोरावर मैत्रेयी जमदाडेने प्राप्त केलेल्या घवघवीत यशामुळे आज ती इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी पदावर रुजू होणार आहे .त्याचा आनंद असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली. विद्यार्थ्यांना शासन सेवेत योग्य ती संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हे ‘महाज्योती‘ करीत आहे. त्यामुळेच आज मैत्रेयी जमदाडे या प्रशिक्षणार्थीनी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (राजपत्रित) पदाच्याच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक आपल्या नावी केले आहे.