लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : अवैध वाळू उत्खनन, वाहतूकमध्ये आघाडीवर असलेल्या खडकपूर्णा नदी व सिंचन प्रकल्प परिसरात महसूल विभागाने पोलिसांच्या संरक्षणात मोठी कारवाई केली. बुलढाणा जिल्हा हद्दीत हस्तगत तसेच जालना परिसरात पसार झालेल्या आणि वाळू तस्करीत वापर करण्यात येणाऱ्या तब्बल पंधरा बोटी जिलेटिनचा वापर करून उद्ध्वस्त करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील कारवाई पथकाच्या हाती तुरी देऊन पसार होणाऱ्या तस्करांना मोठा फटका बसला आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी आणि त्यावरील बृहत सिंचन प्रकल्प हा विस्तीर्ण पट्टा वाळू तस्करीचे मुख्य केंद्र आहे. या भागातून वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करण्यासाठी विना क्रमांकाचे टिप्पर अन्य जड वाहने, यांत्रिक बोटीचा वापर करण्यात येतो. वाळू तस्करांचे मनोधैर्य इतके वाढले की तलाठी, कोतवाल, नायब तहसीलदार, आदी कर्मचाऱ्यावर हल्ले करण्यात किंवा त्यांना वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न करण्यासही ते मागेपुढे पाहत नाही.

आणखी वाचा-महाविकास आघाडीची सत्ता उलथवून लावण्यासाठी महायुतीची खेळी; जिल्हा बँकेचे अध्यक्ष अविश्वासाच्या…

या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा व बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांच्या सयुक्त पथकाने जिल्हास्तरीय शोध पथकाच्या सहाय्याने वाळू तस्करांविरुद्ध बुधवारी मोठी कारवाई केली. संध्याकाळी उशिरापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईअंती पंधरा बोटी जिलेटिन या स्फोटक पदार्थांच्या मदतीने नष्ट करण्यात आल्या. मागील काही अपयशी कारवायांमधील अनुभव लक्षात घेऊन सुसज्ज नियोजन करण्यात आले. ड्रोन कॅमेरे, पोलीस बंदोबस्त, अगोदरच जालना जिल्ह्यातील महसूल यंत्रणांना प्रामुख्याने जाफ्राबाद तहसीलदारांना देण्यात आलेला इशारा, यामुळे ही मोहीम यशस्वी झाली.

या कारवाईत देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर भागात दोन बोटी, इसरूळ-बायगाव शिवारात एक बोट अशा तीन बोटी जप्त करण्यात आल्या. त्या जिलेटिनच्या साहाय्याने उडविण्यात आल्या आहे. तसेच सिनगाव जहागीर येथील कारवाईत बोटीत तीन मजूर सापडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार जाफ्राबाद यांच्याशी सकाळपासून संपर्क सुरू होता. त्यांच्या भागात गेलेल्या सहा मोठ्या तर सहा छोटया बोटी अशा एकूण बारा बोटी त्यांनी पकडल्या. त्या बोटीसुद्धा जिलेटीनने उडविण्यात आल्या.

आणखी वाचा-दंडात्मक कारवाईला ‘खो’; राज्यभरात अडीच हजार कोटींवर वाहतूक ई-चालान प्रलंबित

बुलढाणा जिल्ह्यात तीन व जाफ्राबाद तालुक्यात बारा अशा एकूण पंधरा बोटींवर कारवाई झाली. या कारवाईत तहसीलदार देऊळगाव राजा, तहसीलदार चिखली व त्यांचे कर्मचारी पथक सहभागी होते. पोलीस विभागाचे सहकार्य लाभले. शोध पथक व ड्रोन कॅमेरा यांच्यामुळे कारवाई यशस्वी झाली.