अकोला : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत दिली जाते. यावर्षी क्रीडा गुण सवलतीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. क्रीडा गुणांचा प्रस्ताव ऑफलाइनऐवजी ऑनलाइन सादर करावा लागेल. त्यासाठी विशिष्ट मुदत दिली असून मुदतीत ऑनलाइन प्रस्ताव सादर न केल्यास क्रीडा गुणांपासून खेळाडू विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून…

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे क्रीडा गुण दिले जातात. या गुणांमुळे विद्यार्थ्यांना सवलत मिळते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबतच खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी क्रीडा गुण देण्याची पद्धत सुरू करण्यात आली. इयत्ता दहावी पूर्वी खेळाडू विद्यार्थ्याने प्रावीण्य मिळवले असले तरी, सवलतीचे गुण मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी त्याच खेळ प्रकारात किमान जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे आवश्यक आहे. दहावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केले असले तरी त्या खेळाडू विद्यार्थ्याला उच्चतम अशा एकाच स्पर्धेच्या गुणास पात्र ठरवले जाते.  

आतापर्यंत अशी होती पद्धत

इयत्ता दहावी व बारावीमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत सवलत गुण (ग्रेस गुण) देण्याची पद्धत सुरू आहे. खेळाडू विद्यार्थ्यांचे सवलत गुण अर्ज सन २०२३-२४ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे मागविले जात होते. सन २०२४-२५ या वर्षापासून त्यामध्ये मोठे बदल केले. आता खेळाडू विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करणे बंधनकारक

खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ‘आपले सरकार’ या पोर्टलद्वारे सादर करावे लागणार आहेत. दहावी व बारावी परीक्षेत प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांनी सवलत गुणांचे अर्ज ‘आपले सरकार’ या पोर्टलद्वारे ५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. दहावी किंवा बारावीच्या परीक्षा प्रवेश पत्राची (हॉल टिकीट) छायांकित प्रत, क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, विभागीय शिक्षण मंडळ अमरावती यांच्याकडे प्रति खेळाडू भरलेल्या चलनाच्या पावती आदी कागदपत्रांसह ऑनलाइनद्वारे प्रस्ताव खेळाडू विद्यार्थ्यांना सादर करणे आवश्यक आहे. क्रीडा गुणांच्या सवलतीसाठी आता ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची कसरत खेळाडू विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.

Story img Loader