बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरीची आजची सकाळ ‘ज्वालाग्रही’ ठरली असून भीषण आगीच्या घटनेची वार्ता घेऊन आली. मलकापूर येथील एका मोठ्या कार रिपेअरिंग गॅरेजला भीषण आग लागली. महागड्या कारसह वाहनांचे सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

आज सोमवार, वीस जानेवारीला सकाळी लागलेल्या या आगीचे कारण दुपारी एक वाजेपर्यंत कळू शकले नव्हते. अग्नितांडवात लाखो रुपयांची हानी झाल्याचे सांगितले जात आहे. मलकापूरच्या बुलढाणा मार्गावरील मधुबन नगरमध्ये इरफान भाई यांचे सानिया कार गॅरेज आहे. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी गॅरेजमध्ये भीषण आग लागली. या आगीने पाहतापाहता रौद्ररूप धारण केले. सकाळची वेळ असल्याने आगीची महिती उशिरा मिळाली.

हेही वाचा…भाजप सदस्य नोंदणी! आधीच घायकुतीस, त्यात पुन्हा टार्गेट वाढले; आता दिमतीस तंत्रज्ञ…

गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दहा ते बारा कार आणि मोठ्या प्रमाणावर असलेले स्पेअर पार्ट्स, इतर सामग्री, दुरुस्तीची उपकरणे, अन्य वस्तू मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार, चाळीस लाखांचे नुकसान झाल्याचे समजते.

हेही वाचा… काँग्रेसकडून ‘आरएसएस’वर बंदी घालण्याची मागणी का होत आहे ? सरसंघचालकांच्या अटकेसाठीही…
.
स्विफ्ट पेटली अन् आग पसरली?

सूत्रांनुसार, सानिया गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कार पैकी मारूती स्विफ्ट डिझायर गाडीला अचानक आग लागली. गॅरेजमध्ये ज्वालाग्रही वस्तू जास्त असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करून इतर वाहनांनाही आपल्या कवेत घेतले. लाखोंचे महागडे स्पेअर पार्ट्सही जळून भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मलकापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. चालक वासुदेव भोपळे आणि अग्निशमन दलाने तीन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅरेजमधील वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आणि इतर सामग्रीची राखरांगोळी झाली असून लाखोंचा फटका बसला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader