अकोला : पातूर येथील शिक्षणसंस्थेमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाला असून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नकार दिल्यावर शिक्षिकेचा मानसिक छळ तसेच पीडितेच्या पती व मुलास जिवे मारण्याची धमकी दिली. राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) प्यारे जिया खान यांनी अनुदानित उर्दू शाळांना भेट दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून चार जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पातूर येथील उर्दू शाळेबाबत काही तक्रारी अल्पसंख्याक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खान यांनी या शाळांना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. शाळाभेटीदरम्यान विविध शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. संस्थेत गैरकारभार, शोषण आदी गंभीर तक्रारी असून, याबाबत संपूर्ण तपास करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्यारे जिया खान यांनी दिले.

दरम्यान, ५३ वर्षीय पीडितेने दोन तक्रारी दाखल केल्या. पातूर शहरातील किला बाग परिसरातील उर्दू शाळेत साहाय्यक शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. ७ सप्टेंबर २०२३ रोजी संस्था सचिव सय्यद कमरुद्दिन याने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली. नकार दिला असता सचिव सय्यद कमरुद्दिन याने पीडितेला शाळेतून निलंबित केले. पीडिता २३ जानेवारी २०२५ रोजी शाळेत गेली असता तिला धमकी देण्यात आली. २४. जानेवारी २०२५ रोजी संस्था सचिवाने बडतर्फ केले. १ फेब्रुवारी २०२५ रोजी पीडिता थकीत वेतन घेण्यासाठी सचिवाच्या घरी गेली असता सचिवाने तिच्याकडे ४० हजार रुपयांची मागणी केली. तक्रार केल्यास पती, मुलगी व मुलास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

या प्रकरणी हाजी सख्यद कमरोहिन सव्यद इस्माईल (रा. मरहबा कॉलनी, पातुर), सय्यद फराजउद्दिन सय्यद कमरुद्दिन (मरहबा कॉलनी, पातुर), फरिया समरीन सय्यद कमरोद्दिन (रा. देवडी मैदान, पातुर), जावेद उर रहमान अब्दुल वाजिद (रा. देवली मैदान, पातुर) यांच्याविरुद्ध पातुर पोलिसात अप नंबर व कलम ४४/२०२५ कलम ७४, ७५, २९६, ३०८(२), ३५१(२-३), ३(५) बीएनएस व भादंवि ३५४, ३५४अ, ३९४, ३८४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार आरोपीला उपचारार्थ अकोल्यात दाखल करण्यात आले आहे.