लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच देशाच्या राजकारणालाच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘ चारसो पार’ची घोषणा देणाऱ्या भाजपला निकालाने धक्का दिला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याची प्रचिती मंगळवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापुढे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे आली.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा विजयी झाले. या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. गडकरी यांच्या विजयाची घोषणा होताच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानापुढे जल्लोष केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या हाती गडकरी यांना पंतप्रधान करा, अशा आशयाचे फलक होते. त्यावर ‘ देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी साहेब हो ही देवाकडे प्रार्थना’ असे लिहिले होते. हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. गडकरींच्या विजयाचा आंनंद साजरा करतानाच त्यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा कार्यकर्त्यांची आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. मिठाई वाटण्यात आली. कार्यकर्त्यांच्या जल्लोषात खुद्द गडकरी सहभागी झाले होते.

आणखी वाचा-धानोरकर कुटुंबीयांची परंपरा; केंद्र व राज्याच्या मंत्र्यांना करतात पराभूत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे वरिष्ठ नेते असून त्यांचे नाव यापूर्वीही भाजपची सत्ता आल्यावर पंतप्रधानपदासाठी घेतले जात होते. आता त्यांना संधी आहे, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळेच त्यांनी फलकाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

दरम्यान निकालाच्या दिवशीच पंतप्रधानपदासाठी गडकरी यांचे नाव कार्यकर्त्यांनी पुढे केल्याने याची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. गडकरी यांचे सर्व पक्षातील नेत्यांचे उत्तम संबंध असून त्याची अनेकदा चर्चाही होते. अनेकदा याच चर्चेमुळे ते राजकीयदृष्ट्या अडचणीची ठरली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने गडकरी यांचे नाव या पदासाठी पुढे करावे, अशीही चर्चा निवडणूक निकालापूर्वीपासूनच सुरू झाली होती.त्याला आज कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे पुन्हा तोंड फुटले आहे. गडकरी यांनी मात्र यावर अधिकृतरित्या काहीही काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

आणखी वाचा-चंद्रपूर: ‘निर्भय बनो’, ‘संविधान’चा फायदा काँग्रेसला; ओबीसी, दलित, मुस्लीम समाजाची गठ्ठा मते धानोरकरांना

दरम्यान सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारे गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातील इतिहासातील दुसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी हॅट्रिक केली होती. ते सलग चारवेळा निवडणुका जिंकले होते. २०१४ मध्ये गडकरी यांनी मुत्तेमवार यांचा पराभवकरून लोकसभा गाठली होती. २०१९ आणि २०२४ अशा दोन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत गडकरी यांच्या विजयात त्यांनी केलेल्या विकास कामांना मोठे श्रेय असल्याचे बोलले जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make nitin gadkari prime minister workers demand in front of gadkari residence cwb 76 mrj
Show comments