सुमित पाकलवार, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डासाच्या विशिष्ट प्रजातीच्या मादीने चावा घेतल्यामुळे होणाऱ्या मलेरिया आजाराने गडचिरोली जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या दहा महिन्यात मलेरियाचे ८४२९ रुग्णाची नोंद झाली आहे, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  मागीलवर्षी हा आकडा १२,३२६ इतका होता. मलेरिया निर्मूलनासाठी हिवताप विभाग दिवसरात्र धडपडताना दिसून येत असला तरी अपुरे मनुष्यबळ आणि रस्त्यांअभावी दुर्गम भागात पोहोचण्यास मोठी अडचण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> नागपूर: पहाटे तीन वाजताच्या सुमारास धावत्या बसमध्ये एकटी तरुणी झोपेत असताना झाले असे की…

२०१४ -१५ साली एकट्या गडचिरोली जिल्ह्यात ३२ हजार मलेरियाचे रुग्ण सापडले होते. तेव्हापासून जिल्ह्यातील हिवताप आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनामुळे ही रुग्ण संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली. मात्र, दरवर्षी हा आकडा दहा हजारावर जातोच. राज्यात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. यंदा ऑक्टोबरपर्यंत ८४२९ रुग्णाचे निदान झाले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ४७६२ रुग्ण एकट्या नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील आहे. दोन दिवसांपूर्वी लाहेरी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कवंडे या गावी १८२ पैकी तब्बल ५७ जणांना मलेरियाचे निदान झाले. आशा सेविका, आरोग्य कर्मचारी या भागात भेटी देऊन नियमित तपासणी करतात. डासांच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी प्रशासनाकडून फवारणी, मच्छरदाणी वाटप आदी उपाययोजना करण्यात येतात. मात्र, मलेरियाप्राभावित तालुके अतिदुर्गम भागात मोडत असल्याने त्यातील अनेक गावात रस्तेअभावी आरोग्य सेवकांना पोहोचणे जिकरीचे ठरत आहे. सोबतच अपुरे मनुष्यबळसुद्धा मलेरिया निर्मूलनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याने राज्य प्रशासन खडबडून जागे झाले, तसे गडचिरोली जिल्ह्याबाबत घडताना दिसून येत नाही, अशी खंत या भागातील आदिवासी नागरिक व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा >>> नागपूर अधिवेशनात पोलिसांना पहिल्या दिवशी दुपारी करावा लागला सक्तीचा उपवास

मागील वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी यंदा रुग्णाची संख्या लक्षणीय आहे. आमचे कर्मचारी मलेरियाप्रभावित क्षेत्रात नियमित तपासणी करीत आहेत. म्हणूनच रुग्णांचे निदान होत आहे. त्यांना वेळेवर उपचार मिळत आहे. मलेरियापासून बचावासाठी वेळोवेळी त्या भागातील नागरिकांना सूचना देण्यात येतात. विविध उपाययोजना आम्ही करतोय.– डॉ. कुणाल मोडक, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली.