नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक व करसहायक या संवर्गाच्या ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षेत टंकलेखनासाठी देण्यात आलेले ‘कीबोर्र्ड’ हे जुने किंवा नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना निर्धारित कालावधीमध्ये टंकलेखन करणे कठीण होत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, ‘एमपीएससी’च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत पात्रता गुणांहून अधिक गुण मिळवूनही ‘कीबोर्ड’च्या तांत्रिक गोंधळाचा उमेदवारांचा फटका बसत आहे.
यासंदर्भात ‘एमपीएससी’ला निवेदन देण्यात आले. याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून त्यांनी न्याय मिळण्याची अपेक्षा केली आहे. विद्यार्थ्यांच्या निवेदनानुसार, आयोगाने याआधी १ ते ३ जुलै रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर परीक्षा ४ जुलैपासून सुरू झाली. परंतु, त्यादिवशीदेखील ‘कीबोर्र्ड’ची तांत्रिक अडचण दूर झालेली नसल्यामुळे अनेक उमेदवारांना अडचणीस सामोरे जावे लागले.‘एमपीएससी’द्वारे नेमणूक करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
हेही वाचा >>>“मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते,” अन्नत्याग करून ‘तिने’ मृत्यूला कवटाळले!
उमेदवारांचे निवेदन ‘एमपीएससी’ला मिळाले असून त्यांचे नुकसान होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून यासंदर्भात अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी