लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : पंतप्रधान देशाचे असतात. विविध राज्यांना औद्योगिक प्रकल्प, विकास प्रकल्प देण्याचे काम पंतप्रधानांचे असते. परंतु मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात पळवून नेतात, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ते शनिवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

खरगे म्हणाले, मोदी आधी काँग्रेसकडून ७० वर्षांचा हिशेब मागत होते. आता ५५ वर्षांचा हिशेब मागत आहेत. आम्ही तर हिशेब देतोच. पण, मोदी साडेतेरा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री आणि ११ वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांनी सुमारे २५ वर्षांचा हिशेब जनतेसमोर ठेवला पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून योग्यपद्धतीने काम केले असते तर आज त्यांना इतर राज्यांचे प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्याचे उद्योग करावे लागले नसते.

आणखी वाचा-“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका

नागपूर शहरात दोन मोठे नेते आहेत. पण, त्यांचा प्रभाव मोदींसमोर टीकत नाही. नागपूरला येऊ घातलेले प्रकल्प गुजरातला पळवण्यात येत आहेत. पण, हे दोन्ही नेते गप्प बसले आहेत. त्यांना आपली खुर्ची टिकावयची आहे. त्यामुळेच तर नागपुरात प्रस्तावित एअरबसचा विमान निर्मिती प्रकल्प गुजरातला नेण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात बुलेट ट्रेनची घोषणा झाली. त्या गाडीसाठी उभारण्यात आलेला पूल कोसळला तरी गाडी काही सुरू झाली नाही. राम मंदिर उभारण्यात आले. तेथे मोदींचे हात लागले आणि पहिल्या पावसात ते गळू लागले. नवीन संसद भवनाचीही अशीची स्थिती आहे. गेल्या दहा वर्षांत सुमारे ४०० रेल्वे अपघात झाले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. त्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. तो पुतळा देखील कोसळला. मोदींचे हात जेथे लागतात, तेथे अनर्थ होत होतो, हे दिसून आले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आणखी वाचा-अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

मोदींकडून कोविंद यांना लाल रंगाचे संविधान भेट

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेला संविधानाची प्रत भेट दिली होती. त्यासंदर्भातील छायाचित्र खरगे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. प्रकाशकांनी संविधानाचे मुखपृष्ठ कोणत्या रंगाचे छापावे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु पुस्तकाच्या रंगाचा मुद्दा करून लोकांच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीकाही खरगे यांनी केली. संविधान सन्मान संमेलनात लाल रंगाच्या मुखपृष्ठाच्या संविधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. तसेच भारत जोडो अभियानात काम करणाऱ्या संघटनांना शहरी नक्षली म्हटले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur rbt 74 mrj