निविदा काढणाऱ्या व्यक्तीच्या संस्थेलाच कंत्राट, अन्य संस्थांना रोखण्यासाठी जाचक अटी
देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर : इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी उभारण्यात आलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) अधिकारी आणि कंत्राटदारांच्या आर्थिक कल्याणाचे केंद्र बनल्याचा आरोप होत आहे. नेट, सेट प्रशिक्षणाच्या ‘निविदा’ तयार करण्याचे तांत्रिक काम देण्यात आलेल्या व्यक्तीच्याच खासगी शिकवणी संस्थेला कंत्राट मिळवून देण्यासाठी निविदेमध्ये प्रचंड जाचक अटी टाकून अन्य संस्थांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
‘महाज्योती’ने २ मे रोजी नेट, सेट परीक्षेचे प्रशिक्षण देणाऱ्या शिकवणी संस्थांसाठी निविदा काढली. ही निविदा काढण्याचे तांत्रिक काम देण्यात आलेल्या व्यक्तीची स्वत:ची शिकवणी संस्था असून त्याच संस्थेला नेट, सेट प्रशिक्षणाचे काम मिळावे, अशा पद्धतीने अटी व शर्ती ठेवण्यात आल्याचा आरोप अन्य संस्थांनी केला आहे. काही संस्थांनी ‘महाज्योती’कडे लेखी तक्रारही केली आहे. अन्य संस्थांच्या तक्रारीनुसार, राज्यात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणाऱ्या शेकडो संस्था आहेत. त्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी झालेल्या संस्था, खासगी कंपन्या किंवा भागीदारी संस्थांचाही समावेश आहे.
प्रामुख्याने सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्था या धर्मादाय स्वरूपाच्या संस्था असतात. मात्र, ‘महाज्योती’च्या निविदेमध्ये संस्था नोंदणी प्रशिक्षण आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या गुणदानामध्ये फक्त कंपनी, दुकान कायदा आणि भागीदारी संस्था यांनाच गुण देण्याची अट घातली. त्यामुळे राज्यात स्पर्धा परीक्षा प्रशस्तिपत्रक देणाऱ्या पण सार्वजनिक विश्वस्त कायद्याअंतर्गत नोंदणी केलेल्या संस्थांना पद्धतशीरपणे डावलण्यात आले. ज्यांनी निविदा काढली त्यांच्याच खासगी कंपनीला कंत्राट मिळावे, या उद्देशाने हा सर्व डाव रचण्यात आल्याचा आरोप आहे.
सारथी, बार्टी आणि टीआयआरटीआय या प्रशिक्षण संस्थांनी अशी अट टाकली नसताना ‘महाज्योती’ने केलेल्या या प्रकारावर टीका होत आहे. राज्यात विविध समाजांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावावर कोटय़वधींचा भ्रष्टाचार करण्यासाठी निविदा काढणारा तांत्रिक विभाग, संबंधित अधिकारी आणि प्रशिक्षण संस्थांचे सर्वेसर्वा यांची एक साखळी मिळून हे काम करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ‘महाज्योती’मध्ये ज्या व्यक्तीला निविदा काढण्याचे काम देण्यात आले त्याने सारथी, टीआयआरटीआय येथेही असाच प्रकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ‘महाज्योती’ने या विषयाला गांभीर्याने घेऊन हा भ्रष्टाचार रोखावा, अशी मागणी होत आहे.
आक्षेप काय?
शिकवणी संस्थेची उलाढाल दीड कोटी रुपये असावी, अशी निविदेमध्ये अट आहे. करोनाकाळात बहुतांश संस्था बंद होत्या किंवा त्यांच्या कामावर परिणाम झाला होता. स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या खासगी संस्थांची गेल्या तीन वर्षांत इतकी मोठी उलाढाल असणे अशक्य आहे. त्यातच हे उत्पन्न फक्त नेट, सेट परीक्षेच्या शिकवणीतील असावे, अशी अट टाकण्यात आली. निविदा काढणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या भल्यासाठीच या अटी निविदेत समाविष्ट केल्याचा आक्षेप आहे. आतापर्यंत यूपीएससी, एमपीएससी किंवा इतर कोणत्याही आयोगाने स्पर्धा परीक्षेसाठी निविदा काढताना अशी विचित्र आणि भ्रष्टाचारास वाव देणारी अट टाकली नाही.
निविदा प्रक्रियेमध्ये कुठलाही गोंधळ असल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. यात काही घोळ आढळल्यास निविदा प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेऊ. – प्रदीपकुमार डांगे, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती