नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये मोठा गैरव्यवहार करून काही उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेतील गुण वाढवण्यात आल्याचा आरोप सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. स्पर्धा परीक्षार्थीचे नेतृत्व करणाऱ्या एका संघटनेने या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले आहेत. यासोबतच एमपीएससी अध्यक्षांच्या निवृत्तीला दोन दिवस बाकी असताना हा सगळा गैरव्यवहार झालाच कसा अशी शंका ही उपस्थित केली जात आहे.
मागील दोन दिवसांपासून ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर बळीराम डोळे यांची ही पोस्ट फिरत असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक शंका उपस्थित केला जात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्य परीक्षेच्या उत्तर पत्रिकांमध्ये काही उमेदवारांचे गुण वाढवण्यात आल्याची माहिती आहे. बळीराम डोळे यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपानंतर संबंधित विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका फेर तपासणीला पाठवण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर सर्वत्र आरोप होत असतानाही या प्रकरणात अद्यापही आयोगाकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे गैरप्रकाराच्या शंका अधिक बळावत आहेत.