अमरावती : दुचाकीने गावी सोडून देण्याची बतावणी करून एका अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. ही धक्कादायक घटना कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. महेश रमेश गोरे (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो एका गावातील सरपंचाचा मुलगा असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित १५ वर्षीय मुलगी ही अमरावतीला शिक्षण घेत आहे. शनिवारी सायंकाळी ती बसची वाट पाहत अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात उभी होती. त्यावेळी महेश हा दुचाकीने तेथे आला. त्याने पीडित मुलीला गावी सोडून देतो, असे म्हटले. महेश हा परिचयातील असल्याने ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर दोघे दुचाकीने गावाकडे जाण्यास निघाले.

हेही वाचा…महिलांना सुरक्षेसाठी परवाने द्या, मी रिव्‍हॉल्‍व्‍हर देतो, ‘या’ नेत्‍याच्या वक्तव्याने खळबळ

परंतु, महेशने मार्डी पोहोचण्यापूर्वीच मार्गात दुचाकी थांबविली. तो पीडित मुलीला चिखली शिवारातील निर्जनस्थळी घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. पीडित मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यावर नागरिकांनी महेशला चोप दिला. त्यानंतर घटनेची माहिती कुऱ्हा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार डॉ. अनुपकुमार वाकडे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी महेशला आपल्या ताब्यात घेतले.

या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महेशविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलींच्‍या सुरक्षिततेविषयी पालकांमध्‍ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा…अकोला : जय मालोकारच्या कुटुंबाचे राज ठाकरेंकडून सांत्वन, घातपात झाल्याचा…

बदलापूर येथील लैंगिक अत्‍याचाराच्‍या घटनेने समाजमन ढवळून निघालेले असताना देखील महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटना घडतच आहेत. काही दिवसांपूर्वी अमरावतीत एका शाळेतील शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीच्‍या शरीराला आक्षेपार्ह स्‍पर्श करून (बॅड टच) विनयभंग केल्‍याचा प्रकार उघडकीस आला होता.

हेही वाचा…विदर्भ क्रिकेट संघाला गळती, नेमके कारण काय?

कोलकाता आणि बदलापूरच्‍या घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्‍ये जनजागृती कार्यक्रम सुरू केला असून महिला पोलीस अधिकारी आणि त्‍यांचे पथक विद्यार्थी, विद्यार्थिनींना लैंगिक अत्‍याचार, छेडखानीचे प्रकार रोखण्‍यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.