नागपूर: वनविभागाच्या लेखापाल, लघुलेखक अशा विविध पदांसाठी सोमवारपासून परीक्षा सुरू झाली. परंतु, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद येथील राणा अकॅडमी येथील परीक्षा केंद्रावर उमेदवारांना उत्तरे पुरवताना विनोद प्रजापती ढोबाळ या आरोपीला अटक करण्यात आली.  मुंबई पोलीस भरतीनंतर वनविभागाच्या परीक्षेतही गैरप्रकार आढळून आल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने वनविभागाच्या भरतीमध्येही अनेक घोळ सुरू असल्याचा आक्षेप नोंदवला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी प्रकरण: अमरावती पोलिसांचा यवतमाळ जिल्ह्यात तपास

या भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा येत्या ११ ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. वनरक्षक भरतीसोबतच सर्वेक्षण, लेखापाल, लघुलेखक तसेच संख्याशास्त्राची पदभरती केली जाणार आहे. टीसीएस कंपनी ही परीक्षा घेत आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद येथील राणा अकॅडमी या केंद्रावर विनोद ढोबाळे या आरोपीला पकडण्यात आले. परीक्षा केंद्राच्या बाहेरून तो काही उमेदवारांची प्रश्न पाहून त्यांना उत्तरे पुरवित होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्याला अटक करण्यात आली. त्याचा प्राथमिक तपास सुरू असल्याची माहिती औरंगाबाद चिकलठाणाचे पाेलीस निरीक्षक गौतम पराते यांनी दिली. विशेष म्हणजे, वनविभागाच्या परीक्षेसाठी पाच लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी राज्यभरात १२९ परीक्षा केंद्र आहेत. या भरतीप्रक्रियेअंतर्गत वनरक्षकांची २, १३८ पदे भरली जाणार आहेत.

हेही वाचा >>> नागपुरात आणखी एक हत्याकांड; युवकाचा दगडाने ठेचून खून

राज्यभरातील केंद्रांवर गैरप्रकार?

सध्या औरंगाबाद केंद्रावरून एकच आरोपी पकडण्यात आला असला तरी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची टोळी राज्यभर पसरली असून अनेक केंद्रांवर असे गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. यासाठी सर्व परीक्षा केंद्र हे टीसीएस कंपनीचेच असावेत अशी मागणी समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for giving answer sheets to the candidates appearing in forest department exams dag 87 zws