लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राजा शरीफच्या बँक खात्यातून रक्कम काढणार्‍या सदर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. रोहित उर्फ क्लेमंट पिल्ले (३२) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शिवनी येथील पोक्सो प्रकरण आणि वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याने ७ लाख ८० हजार रुपये एटीएमव्दारे काढले. ही रक्कम शाहिद शरीफ आणि शाहीद शरीफची खास मैत्रिण रूख्सार ऊर्फ रुपाली हिच्या जामिनासाठी खर्च केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

आरटीई अंतर्गत बनावट कागदपत्राच्या आधारे मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी लाखोंचा घोटाळा करणाऱ्या टोळीचा सूत्रधार शाहीद शरीफ याच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष तपास समिती गठीत केली. मात्र, शाहिद विदेशात पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान पोलिसांनी त्याची व्यवस्थापक रुपाली हिला अटक केली तसेच शाहीदचा भाऊ राजा शरीफला अटक केली. दरम्यान पोलिसांनी या दोघांचेही बँक खाते गोठविले होते. पोलीस तपासात आरोपी रोहितने राजा शरीफच्या बँक खात्यातून ७ लाख ८० हजारांची रक्कम काढली. राजा आणि रुख्सारच्या जामीनासाठी ही रक्कम खर्च केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. रुख्सार ही शाहीद शरीफची खास मैत्रिण होती. तिच्या बँक खात्यात त्याने काळा पैसा जमा केला होता. मात्र, गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच रुख्सारने शाहिद शरीफची मोठी रक्कम आपल्या काही नातेवाईकांकडे ठेवली.

आणखी वाचा-बाळासाहेबांच्या वैचारिक अध्यायाचा हा चिंताजनक प्रवास – मुनगंटीवार

पोलीस शोध घेत असल्याचे समजताच रोहित गोव्याला पळून गेला होता. अलिकडेच तो नागपुरात आला. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने ११ ऑगस्ट पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त राहुल मदने, सहायक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे, पोहवा रवींद्र, अमोर, प्रमोद आणि संजय यांनी केली.

वन्यप्राण्यांची शिकार प्रकरणी वनकोठडी

आरटीई अंतर्गत बनावट कागदपत्राच्या आधारे मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी लाखोंचा घोटाळा करणारा शाहीद शरीफचा भाऊ राजा शरीफचा सदर पोलिसांनी मोबाईल जप्त करून तपासणी केली. मोबाईलमध्ये त्यात वन्यप्राण्यांची शिकार केल्याचे निष्पन्न झाले. मध्यप्रदेशातील सिवनी, बालाघाटच्या जंगात राजाने शिकार केली होती. तसा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरलही केला. सदर पोलिसांनी ही माहिती वन विभागाला दिली. तसेच राजाला मध्यप्रदेश वनविभागाच्या ताब्यात दिले. वन विभागाने राजा शरीफ, आमिर अजीज, जाफर खान आणि शादाब खान यांना अटक करून न्यायालयाच्या आदेशाने वन कोठडी मिळविली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for money withdrawn from raja sharifs bank account adk 83 mrj