बुलढाणा :  बुलढाणा तालुक्यातील जनुना-गुम्मी  शिवारात मागील एका महिन्यापूर्वी  दोन बिबटयांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.यामुळे खळबळून जागे झालेल्या वन विभागाने वेगाने तपास चक्रे फिरविली. या दोन बिबटयाच्या संशयस्पदरित्या बिबट्यांचा मृत्यू प्रकरणी वन विभागाने  बुलढाणा तालुक्यातील गुम्मी गावातून एका इसमास अटक केली आहे.

त्याची कसून चौकशी करण्यात येत त्या आधारे घटनेचा तपास करण्यात येत आहे. या बिबट्यांना  मटणातून विष कालवून ठार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेत आणखी काही आरोपी असल्याची दाट शक्यता असून वन विभाग कर्मचाऱ्यांचे पथक त्या दृष्टीने तपास करीत आहे.

बुलढाणा वन परिक्षेत्रातील गिरडा, गुम्मी जनुना शिवार परिसरातील दाट जंगलात  बिबट्यांसह  विविध जंगली प्राण्यांचा अधिवास आहे. यातील जनुना, गुम्मी शिवारात कमी अधिक एक महिन्यापूर्वी दोन बिबट्यांचा  संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती.  घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वन विभागाने वेगाने तपास सुरु केला.

पुढील तपासात काही पुरावे हाती  येऊन वन विभागाने  बुलढाणा तालुक्यातील गुम्मी येथील रहिवासी आरोपी सुनिल रामदास दांडगे( वय ३५ वर्षे  याला अटक केली आहे. तसेच वन विभागाच्या तपास चमुने जनुना गाव शिवार परिसरातून बिबट्याची हाडे जमा केली होती. त्यानंतर तीहाडे उच्च स्तरीय तपासणी   करीता पाठविण्यात आली.

प्राथमिक तपासणी अहवालातून या बिबट्यांना,  बकर्‍याच्या मटनातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वनविभागाच्या चमुने  गुम्मी येथील सुनिल रामदास दांडगे याला अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य  लक्षात घेता आरोपीचे आणखी काही साथीदार आहेत का, त्यांनी नेमके काय केले याचा शोध  घेण्याच्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. आज शुक्रवारी  अकरा एप्रिल रोजी आरोपी सुनिल दांडगे यास सोबत घेऊन वन विभागाची चमु पुढील तपास करीत आहे.

दरम्यान सुनिल दांडगे याने विषारी औषध टाकून बिबट्यांना का मारले ? यामागे तस्करी की, इतर काही कारण आहे का ? याचा शोध घेतला जात आहे. काही गावकर्‍यांच्या मते दांडगे यांच्या बकर्‍यांना  बिबट्याने मागील काळात शिकार करून ठार केले होते. त्याचाच राग म्हणून दांडगे यांनी बिबट्यांना मारण्याचे पाऊल उचलले अशीही चर्चा आहे.तपासात याचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. बुलढाणा शहराच्या  सीमेवरील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन वासरे ठार झाल्याचे वृत्त आहे.

काल, गुरुवारच्या मध्यरात्री बिबट्याने गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढवून तीन वासरांचा फडशा पाडला. क्रीडा संकुलच्या भिंतीला लागून दुर्गादास काळे यांचा गोठा आहे. या गोठ्यात जवळपास विस गुरे ढोरे आहेत. आज सकाळी शेतकरी काळे जेव्हा गोठ्यात नित्यानेमाने पोहोचले तेव्हा दोन वासरू मृतावस्थेत आढळले. एका वासराचे पोट फाडलेले तर इतर दोन वासरांचे गळे चावलेले होते. बिबट्याने गोठ्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट होते.

वासरांना खुंटीला बांधलेले असल्यामुळे बिबट्याला आपली शिकार नेता आली नाही. सदर गोठा गायकवाड ले आऊट मधील रामलक्ष्मी नगर मध्ये आहे. या परिसरात अनेकांनी घरे बांधली आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने बिबट्यांनी नागरी वस्तीकडे पाऊले वळविल्याचे सदर प्रकरणातून अधोरेखित होत आहे. परिणामी क्रीडा संकुल परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाला सदर घटनेबाबत कळविण्यात आले आहे.