लोकसत्ता टीम
नागपूर: जी-२० निमित्त शहर सैंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून रस्ते दुभाजकावर लालवेली झाडे पळवणाऱ्या दोघांना प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी संपन्न कुटुंबातील आहे हे येथे उल्लेखनीय.
वर्धा मार्गावरील छत्रपती चौकातील रस्ते दुभाजकावर महापालिकेच्यावतीने विविध प्रकारची सुशोभित झाडे लावली आहे. दोन दिवसापूर्वी काही झाडे चोरीच गेल्याचा व्हीडीयो समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यामुळे ही घटना उघडकीस आली होती. महापालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांना याबाबत सूचना दिली होती. प्रतापनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या कारच्या नंबर वरून चोरट्यांपर्यत पोलीस पोहचले व त्यांना अटक केली. या प्रकरणात दोन आरोपी आहेत. एकाचे नाव जय असून दुसरा त्याचा मित्र आहे. हे दोघेही रात्री एका कारने छत्रपती चौकात आले. तेथील रस्ते दुभाजकावरील झाडे त्यांनी कारच्या डिक्कीत ठेवली होती. पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी संपन्न कुटुंबातील असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.