लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : वस्तीत राहणाऱ्या तरुणीवर प्रेम जडल्यानंतर युवकाने तिच्याशी प्रेमविवाह करण्यासाठी खूप आटापीटा केला. तो बेरोजगार असल्यामुळे तरुणीच्या वडिलांनी मुलीच्या प्रेमविवाहास विरोध केला. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ म्हणत प्रेयसीला पळवून नेले आणि प्रेमविवाह केला. मात्र, चार वर्षानंतरच पत्नीचे शेजारी राहणाऱ्या युवकाशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय पतीला आला. त्या संशयातून वाद वाढत गेले आणि विपरित घडले.

पत्नी रागाच्या भरात माहेरी आली. तिला घ्यायला आलेल्या पतीला सासरच्या मंडळीने शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नी, मेहुणी आणि सासऱ्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही थरारक घटना मानकापुरात घडली. मलिका विवेक तांडेकर (२४, रा. झिंगाबाई टाकली, मानकापूर), मूलचंद रतिराम वासनिक (५२, रा. झिंगाबाई टाकली) आणि प्रतीक्षा मुलचंद वासनिक अशी जखमींची नावे आहेत.

आणखी वाचा-Bunty Shelke: काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा भाजपा कार्यालयात प्रवेश; प्रचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल, नागपूरमध्ये नेमकं चाललंय काय?

आरोपी विवेक इशूलाल तांडेकर (२६) हा झिंगाबाई टाकळी, मानकापूर परीसरात राहतो. त्याचे मंडप-बिछायत केंद्र आहे. त्याच वस्तीत मलिका हीसुद्धा राहत होती. गेल्या पाच वर्षांपूर्वी दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्यांना आता तीन वर्षांचा मुलगा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विवेक हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचे कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा आळ घेत होता. यातून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. दिवाळीदरम्यान विवेक आणि मलिका यांच्यात वाद झाला आणि ती थेट मुलाला घेऊन माहेरी आली. विवेकला पत्नी आणि मुलाला घरी न्यायचे होते. त्यामुळे तो सोमवारी रात्री दहा वाजता सासरी आला. त्याने पत्नीला घरी जाण्यासाठी तयारी करण्यास सांगितले. मात्र, मलिकाने त्याला नकार दिला. दरम्यान, मेहुणी प्रतीक्षा आणि सासरे मुलचंद वासनिक यांनी विवेकला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे विवेकने त्यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचे ठरविले.

आणखी वाचा-“महाराष्ट्र लुटणाऱ्या मोदी, शहांचे हेलिकॉप्टर तपासा,” उद्धव ठाकरेंचा संताप…

चालत्या गाडीवरुन कुऱ्हाडीचे घाव

मलिका, प्रतीक्षा आणि वडिल मूलचंद हे एका दुचाकीवरुन मानकापूर पोलीस ठाण्यात जात होते. यादरम्यान, विवेकने दुचाकीने त्यांचा पाठलाग केला. पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर चालत्या गाडीवरुन विवेकने तिघांवरही कुऱ्हाडीने वार केले आणि पळून गेला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मूलचंद यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी विवेकला गुन्हे शाखेच्या शुभांगी देशमुख यांच्या पथकाने अटक केली.

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घडली घटना

विवेकने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सासरे मूलचंद यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. मानकापूर ठाण्यातील दोन कर्मचारी घटनास्थळावर पोहचले. कर्मचाऱ्यांनी घटनेला गांभीर्याने न घेता मूलचंद यांना पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देऊन निघून गेले. मूलचंद हे दोन्ही मुलींसह पोलीस ठाण्यात जात असताना रस्त्यातच ही घटना घडली. पोलीस कर्मचाऱ्यांनी जर मूलचंद यांना सोबत ठाण्यात नेले असते तर ही घटना घडली नसती. या घटनेस मानकापूर पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे बोलले जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man attack with axe on three people including wife in nagpur adk 83 mrj