बुलढाणा: जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या संग्रामपूर तालुक्यात मंगळवारी, एक एप्रिल ला अजब गजब घडली. या घटनेने खळबळ पण उडाली आणि तालुका भर खमंग चर्चेला उधाण आले…
आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात एक अजब प्रकार घडला आहे. पत्नी माहेरी गेली आणि काही केल्या नांदायला परत येत नसल्याने एका माथेफिरू माणसाची चांगलीच सटकली! त्याने बायको येत नसल्याचा राग बिचाऱ्या, बापुड्या लाल परी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या बस वर काढला. याने पठ्ठ्याने दगडफेक करीत एसटी बसच्या काचा फोडल्या. यामुळे एसटी बस चालक, वाहक सोबतच प्रवाश्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे वानखेड मधील गावकरी देखील थक्क झाले…
आता या बहाद्धाराने अगोदरच खटारा झालेल्या एसटी बस वर का ‘हल्ला’ का केला त्याच कारणही सर्वांना थक्क करणार आणि बुचकळ्यात पाडणार निघालं.
या माथेफिरूची पत्नी तब्बल पंधरा वर्षांपूर्वी काही अज्ञात कारणावरून त्याला सोडून माहेरी गेली होती. त्यांनी सासरी व नातेवाईकां कडे मदत मागितली, विनवण्या केल्या, पान संतप्त बायको काही केल्या परत आली नाही. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने अनेकदा पोलिसांकडे निवेदनही दिले. मात्र, बायको काही सासरी आली नाही. वर्षानुवर्षे मनात तनात साचलेला त्यांचा हा संताप अखेर ज्वालामुखी सारखा बाहेर उफाळून आला. अखेर आज मंगळवारी, १एप्रिल रोजी संतापलेल्या व्यक्तीने एसटीच्या काचा फोडत पोलीस प्रशासनाकडे आपली पत्नी परत आणवी, अशी विनंती केली.
प्रकाश पिंजरकर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीचे पत्नीशी भांडण झाले होते. कडाक्याचे भांडण झाल्यानंतर ही महिला माहेरी निघून गेली. १५ वर्षांपूर्वीच महिला माहेरी निघून गेल्याची माहिती आहे. प्रकाशने अनेकदा पोलिसांकडे निवेदन दिले होते. पण पत्नी काही घरी परत आली नाही. अखेर आज प्रकाशचा संताप अनावर झाला.
प्रकाशने संतापाच्या भरात एसटीच्या काचा फोडल्या. शेगाव – वानखेड या बसच्या मागच्या काचा फोडल्या आणि बसचे नुकसाने केले. तसेच पोलीस प्रशासनाने पत्नीला परत आणावी अशी विनंती केली. सध्या ही बस वानखेड गावात थांबली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेणार, पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.