अमरावती : भांडण झाल्यानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीला घरी बोलावून तिची पतीने हत्या केल्याची घटना शहरातील यशोदा नगर परिसरात उघडकीस आली आहे. हत्येनंतर पतीने शयनकक्षात पत्नीचा मृतदेह लपवून ठेवला होता.यशोदा नगर परिसरातील भोवते लेआऊटमध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा राहत्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह दिसून आला. हा खून महिलेच्या पतीने करून व तो फरार झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहे. हा घटनाक्रम गुरुवारी रात्री समोर आला.
भाग्यश्री अक्षय लाडे (२८) असे मृत महिलेचे तर अक्षय दिलीप लाडे (३०, दोघेही रा. भोवते लेआऊट, अमरावती) असे फरार झालेल्या पतीचे नाव आहे. भाग्यश्री आणि अक्षय यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना एक पाच वर्षांची मुलगी आहे. अक्षय सेंट्रिंग कंत्राटदार आहे. भाग्यश्री आणि अक्षयचा ३१ डिसेंबरला वाद झाला होता. त्याच दिवशी भाग्यश्री तिच्या आईकडे निघून गेली. १ जानेवारीला रात्री ९ वाजता अक्षयने भाग्यश्रीला फोन केला व तू घरी येऊन तुझे कपडे, इतर महत्त्वाचे साहित्य, कागदपत्र घेऊन जा, असे सांगितले. त्यामुळे भाग्यश्री तिच्या घरी गेली. त्यानंतर मात्र भाग्यश्री तिच्या आईकडे परत आली नाही. तिच्या आईने मोबाईलवर संपर्क साधला असता फोन लागत नव्हता. याचदरम्यान गुरुवारी भाग्यश्रीच्या आईने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून मुलगी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शोध सुरू केला, मात्र दिवसभर भाग्यश्रीचा पत्ता लागला नाही. त्याचदरम्यान पोलिसांना संशय आल्यामुळे गुरुवारी रात्री पोलिसांनी अक्षयचे घर गाठले तर दरवाजाला बाहेरून कुलूप दिसले.
हेही वाचा >>>मराठी भाषा विभागातील अधिकाऱ्यांना मराठी येते काय? शासनाकडून उत्तर देण्यात टाळाटाळ
पोलिसांनी भाग्यश्रीचा शोध सुरू केला. भाग्यश्रीच्या मोबाइलचे लोकेशन अमरावती रेल्वे स्थानकावर मिळाले. पार्किंगमध्ये भाग्यश्रीची दुचाकी दिसली. त्या दुचाकीमध्ये मोबाइल व पर्स मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तर बुधवारी रात्री साडेअकरा वाजता अक्षय स्वत: ही दुचाकी घेऊन आला व दुचाकी उभी करून निघून गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांना शंका आली व त्यांनी घरी जाऊन बाहेरून कुलूप असलेला दरवाजा तोडला. त्यावेळी बेडरूममध्ये भाग्यश्रीचा झाकलेला मृतदेह दिसला. यावरून अक्षयने भाग्यश्रीचा खून केला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दुचाकी रेल्वे स्टेशनवर ठेवून, ती कुठेतरी निघून गेली असे भासवण्याचा प्रयत्न केला.