अमरावती : माहेरी गेलेली पत्नी नांदण्यासाठी परत येत नसल्याने संतप्त झालेल्या जावयाने सासू आणि मेहुण्याची हत्या केली. त्यानंतर स्वत:ला जाळून घेत त्याने आत्महत्या केल्याची घटना वरूड तालुक्यातील वंडली येथे घडली. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. लता सुरेश भोंडे (४७) आणि प्रणय सुरेश भोंडे (२२) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आशीष ठाकरे (२५, रा.वरूड) असे आहे.
हेही वाचा >>> बुलढाणा-मलकापूर राज्य मार्गावर भीषण अपघात, अतिरक्तस्त्रावामुळे आरोग्य कर्मचारी घटनास्थळीच ठार
बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंडली येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास लता सुरेश भोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. आग विझवल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली, तेव्हा त्यांना तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आले. घराला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस पथक पोहचण्याआधीच मागच्या खोलीत झोपलेल्या लता भोंडे यांच्या सासू चंद्रकला (९०) यांना सुखरूप घराबाहेर काढले होते.
हेही वाचा >>> सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची अडचण होणार; पश्चिम व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना…
चौकशीदरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. लता भोंडे यांच्या मुलीचा सहा महिन्यांपुर्वी आशीष ठाकरे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. आशीष हा दारू पिऊन पत्नीला सतत मारहाण करीत होता. त्यामुळे तीन महिन्यांपुर्वी ती माहेरी परत आली. तरीही आशीषचा त्रास सुरूच असल्याने लता यांनी मुलीला मावशीकडे राजुरा बाजार येथे पाठवून दिले. पत्नी घरी नांदण्यासाठी येत नसल्याने संतापलेल्या आशीषने घटनेच्या दिवशी दारून पिऊन घरात प्रवेश केला. सासू लता आणि साळा प्रणय यांची हत्या केली. नंतर पेट्रोलचा वापर करून मृतदेह पेटवून दिले आणि स्वत: देखील जाळून घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी आशीष याने त्याचे मावस सासरे दिनेश निकम यांना मोबाईलवर संपर्क साधून सासू आणि साळ्याची हत्या केल्याचे आणि स्वत: आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे, पोलीस निरीक्षक किरण वानखडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चूलपार यांनी घटनास्थळी भेट दिली.