लोकसत्ता टीम
अमरावती : सतत पैसे मागणाऱ्या पत्नीच्या त्रासापायी पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. यात पतीला छळणाऱ्या पत्नीविरुद्ध परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशोक वसंतराव इंगोले (३५, गौरखेडा कुंभी, ता. अचलपूर) असे मृताचे नाव आहे.
अशोक इंगोले याने १ डिसेंबर रोजी गौरखेडा कुंभी येथे आत्महत्या केली. यावरून परतवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून केली. मात्र, चौकशीदरम्यान अशोक इंगोले याला त्याच्या पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पत्नी सीमा अशोक इंगोले (२९, रा. गौरखेडा कुंभी) हिच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
आणखी वाचा-सुनील केदार यांची प्रकृती बिघडली, रात्री उशिरा मेडिकल रुग्णालयात दाखल
अशोक आणि सीमा यांचा सन २०१२ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर नऊ वर्षे अशोकच्या मूळ गावी हिवरा बुद्रूक येथे दाम्पत्य वास्तव्यास होते. यादरम्यान सीमाने गावातील बचत गटाकडून १ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज काढले; पण तिचे घरात कुणाशीही पटत नव्हते. सासरच्या मंडळीसमवेत ती सतत भांडत राहायची. तिच्या वागणुकीमुळे अशोक त्रस्त होता. यातच दीड वर्षापूर्वी अशोकसोबत भांडण करून सीमा माहेरी गौरखेडा कुंभी येथे मुलीसह निघून आली. काही दिवसांनंतर अशोकही गौरखेडा कुंभी येथे येऊन सीमासोबत राहू लागला. एका धाब्यावर तो मजुरी करू लागला. सीमाने काढलेल्या बचत गटाच्या कर्जाचे हप्ते तो भरत होता. मात्र, त्यानंतरही सीमा अशोकसोबत भांडायची. त्यांच्यातील नाते जवळपास संपुष्टात आले होते.
ती अशोकला जेवायलाही देत नव्हती. सतत पैसे मागायची. हा सर्व घटनाक्रम अशोकने मृत्यूपूर्वी ३० नोव्हेंबर रोजी आपल्या आईला आणि १ डिसेंबरला दुपारी वडिलांना फोनवरून सांगितला. वडिलांसोबत फोनवर बोलणे सुरू असतानाच मध्येच फोन कट झाला आणि काही तासांनंतर अशोकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा निरोप त्याच्या आई-वडिलांना मिळाला.