नागपूर : पती-पत्नीचा सुखी संसार सुरु असतानाच पत्नीच्या आयुष्यात प्रियकर आला. ती प्रियकराच्या एवढी प्रेमात गुंतली की ती विवाहित असल्याचेही विसरली. पती घरात असतानाही ती प्रियकराला घरी भेटायला बोलवायची. पतीने विरोध केल्यास प्रियकराच्या मदतीने पतीला मारहाण करीत होती. पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मानकापूर परिसरात घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

महिलेला अटक केली असून तिचा प्रियकर फरार झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र आणि दुर्गेश्वरी यांचे मोठ्या थाटात लग्न झाले. दोघांच्या संसारात दोन मुले. संसार व्यवस्थित सुरु असतानाच दुर्गेश्वरीच्या आयुष्यात राहुल नावाचा युवक आला. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली. दोघेही मोबाईलवरुन एकमेकांच्या संपर्कात राहायला लागले. त्यानंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले.

पती कामाला निघून गेल्या दोघांच्याही चोरून लपून भेटी व्हायला लागल्या. ती पती घराबाहेर गेल्यानंतर राहुलला फोन करायची. त्यानंतर दोघेही तासनतास घरात गप्पा करीत बसायचे. पती येण्यापूर्वी राहुल तिच्या घरुन निघून जात होता.  दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण पती नरेंद्रला लागली. त्यामुळे तो पत्नीवर लक्ष ठेवायला लागला. नरेंद्र कामावर गेल्यानंतर तासाभरात घरी परत आला. त्यावेळी राहुल घरात आढळून आला. दुर्गेश्वरीने पतीला मित्र असल्याची ओळख करुन दिली. भेटायला आल्याचे सांगून राहुलला थांबायला सांगितले. तेव्हापासून राहुल बिनधास्तपणे दुर्गेश्वरीच्या घरी यायला लागला. दोघांचे प्रेमसंबंध खुलेपणाने सुरु झाले. त्यामुळे पती नरेंद्रने तिच्याशी वाद घालून प्रेमप्रकरण बंद करण्यास सांगितले. मात्र, पत्नी प्रियकराला सोडायला तयार नव्हती.

पतीने केली आत्महत्या

दुर्गेश्वरी आणि प्रियकर राहुल हे बेडरुममध्ये बसलेले होते. त्यावर नरेंद्रने आक्षेप घेतला. त्यामुळे पत्नी व प्रियकराने मारहाण केली. तसेच प्रेमसंबंधाची कबुली दिली. त्यामुळे अपमानीत झालेल्या नरेंद्रने  १७ फेब्रुवारीला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सुरुवातीला मानकापूर पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, परिसरात पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून नरेंद्रने आत्महत्या केल्याची चर्चा होती.

नरेंद्र यांच्या ‘सुसाईड नोट’वरुन गुन्हा

या प्रकरणाच्या तपासादरम्यान नरेंद्रची आरोपी पत्नी दुर्गेश्वरी हिचे आरोपी राहुल याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याने ते दोघेही संगणमताने नरेंद्रला शारीरिक व मानसिक त्रास देऊन अपमानास्पद वागणूक देत होते. दोघांनी मारहाण करत नरेंद्र यांना आत्महत्येस प्रवृत्त केले होते. नरेंद्रने आत्महत्यापूर्वी ‘सुसाईड नोट’ लिहिली होती. त्यात पत्नी व राहुल यांच्यातील अनैतिक संबंधामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला होता. ती चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. मात्र, नवनियुक्त ठाणेदार बबन येडगे आणि तपास अधिकारी पीएसआय शीतल राणे हे दोन्ही अधिकारी या प्रकरणात लपवाछपवी करीत असल्याची चर्चा आहे.

Story img Loader