लोकसत्ता टीम
बुलढाणा: शेगावात आज, बुधवारी उष्माघाताने एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संतनगरीसह आरोग्य सेवा वर्तुळात खळबळ उडाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील उष्माघाताच्या बळीची ही विदर्भातील पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.
आदेश भाऊराव शेगोकार (४९, रा. जोगलखेड, ता. बाळापूर, जि. अकोला) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अंतर्गत घटनेची नोंद केली आहे. सईबाई मोटे सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खेताडे यांच्यातर्फे कक्षसेवक प्रभाकर घनोकार यांनी घटनेची फिर्याद दिली. त्यात उन्हामुळे व उपाशीपोटी असल्याने मृत्यू, असे कारण नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून लेखी ‘मेमो’ प्राप्त झाल्यावर पोलिसांनी मर्ग दाखल केला.