चंद्रपूर: जंगलात गेलेल्या व्यक्तीवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १९) सकाळी घडली. विलास तुळशीराम मड़ावी (५२) रा. डोंगरगाव (सा.) असे मृताचे नाव आहे. या घटनेने डोंगरगाव (सा.) गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेञातील उपक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या नियतक्षेत्र डोंगरगाव (सा.) कक्ष क्रमांक २५२ मध्ये आज शनिवारी (दि. १९) सकाळच्या सुमारास वाघाने हल्ला करून एकाला ठार केल्याची माहिती सिंदेवाही वनविभागाला प्राप्त झाली. त्या आधारे सिंदेवाही वनपरिक्षेञ (प्रादेशिक) चे वनपरिक्षेञ अधिकारी विशाल सालकर, क्षेत्र सहायक नितिन गडपायले, पोलीस निरीक्षक विजय राठोड, डोंगरगाव (सा.) आणि कारघाटा येथील पोलीस पाटिल यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देवून पंचनामा केला. मड़ावी सकाळी गावातील जंगल परिसरात सिंधी आणायला गेले होते. सकाळी अंदाजे १०.३० वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने मड़ावी यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मड़ावी यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा…सावधान ! बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ
वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविला. मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपये मृताच्या पत्नीकडे दिले असल्याची माहिती क्षेत्र सहायक नितिन गडपायले यांनी दिली..