नागपूर : एकुलत्या मुलीवर वडिलाचे जिवापाड प्रेम…मुलीने वडिलांनी घरी येताता चिप्स आणि फ्रूटी घेऊन येण्याचा हट्ट धरला. त्यामुळे वडिलांनी चिप्स आणि फ्रूटी घेतली आणि दुचाकीने घराकडे निघाले.. फोनवरून मुलीला कळवल्याने चिमुकली वडिलांची वाट बघत दारात उभी होती. दरम्यान रस्त्यात भरधाव जीप चालवत असलेल्या तरुणाने तिच्या वडिलांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ज्यात गंभीर जखमी होऊन वडिलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि ती चिमुकली वडिलांची प्रतीक्षाच करीत राहिली.
हेही वाचा >>> निवडणूक लागली, शस्त्रे शासनाकडे जमा करण्याची वेळ झाली!
ही दुर्दैवी घटना बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत मनीषनगर उड्डाणपुलावर घडली. भोजराज नत्थू मांडवकर (३२) रा. चुनाभट्टी, असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जीप चालक अक्षय प्रमोद त्यागी (१८) रा. गाझियाबाद, दिल्ली विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. भोजराज हे धंतोली येथील स्पेक्ट्रम डायग्नोसिसमध्ये रिसेप्शन व्यवस्थापक होते. त्यांना ८ वर्षांची एक मुलगी आहे. रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास काही कामाने घरून निघाले. या दरम्यान मुलीने फ्रुटी आणि चिप्स घेऊन देण्यासाठी वडिलांकडे हट्ट धरला. भोजराज यांनी तिला घरी परतताना दोन्ही वस्तू आणण्याचे आश्वासन दिले आणि एमएच-४०/एएफ-१९९४ क्रमांकाची दुचाकी घेऊन निघाले. ९.३० वाजताच्या सुमारास मनीषनगर उड्डाणपुलावरून पुरुषोत्तम बाजारकडे जात होते. या दरम्यान जीप क्र. एमएच-२९/बीव्ही-०००३ चा चालक अक्षयने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून भोजराजच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात भोजराज गंभीर जखमी झाले.
हेही वाचा >>> “भाजपचे हिंदुत्व थापेबाज, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू…”, उद्धव ठाकरे उमरखेडमध्ये कडाडले
घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. भोजराजला उपचारार्थ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान भोजराज यांचा मृत्यू झाला. भोजराजचे नातेवाईक राहुल हिवराळे यांनी सांगितले की, जीपमध्ये दोन तरुण होते. ते वाहन पूरब दर्डाच्या नावावर नोंद आहे. अक्षयकडे ते वाहन कसे आले आणि त्याच्याजवळ परवाना होता किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही. प्रकरणाची गंभीरतेने तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेने मांडवकर कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.