यवतमाळ : नियमितपणे सायकलिंग करणाऱ्या एका सायकलपटूचे सायकल चालवतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दररोज किमान ३० किलोमीटर सायकलिंग करणाऱ्या सायकलपटूच्या सायकलवरील या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील स्टेट बँकेत कार्यरत अधिकारी नितीन कानीकर (५२), रा. साईनगर, अमरावती असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. ही घटना येथील धामणगाव मार्गावर आयटीआय विद्यालयासमोर आज बुधवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली.
हेही वाचा >>> सामाजिक कार्यकर्त्याचा न्यायासाठी पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतून घेतले आणि…
नितीन कानीकर हे दोन वर्षांपूर्वी यवतमाळ येथील स्टेट बँकेत उपव्यवस्थापक म्हणून अमरावतीहून बदलून आले होते. येथील मेडिकल कॉलेज चौकात ते भाड्याच्या घरात एकटेच राहायचे. त्यांचे कुटुंब अमरावती येथे वास्तव्यास आहे. त्यांना सायलिंगची विशेष आवड होती. दररोज सकाळी २० ते ३० किमी सायकलिंग ते करायचे. आज सकाळी ६.३० वाजता ते धामणगाव मार्गावर सायकलिंगसाठी गेले. सायकलिंग करून परत येताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी एका मित्राला घ्यायला बोलावले. आयटीआय कॉलेजसमोर रस्त्यावर ते सायकलवरून खाली कोसळले. नागरिकांनी तेथे पोहोचलेल्या मित्राच्या मदतीने त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह अमरावती येथे पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व लंडन येथे शिकत असलेली एक मुलगी असा परिवार आहे. येथील क्रीडाभारती सायकलिंग समूहाचे ते सक्रिय सदस्य होते. त्यांनी अनेक स्पर्धेत सायकलिंगमध्ये बक्षीसेही मिळवली होती.