लोकसत्ता टीम

बुलढाणा : दारूवरून दोन भावात झालेल्या वादाचे पर्यवसन बेदम हाणामारीत झाल्याने धाकट्या भावाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेने संग्रामपूर तालुका हादरला आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील व आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथे बुधवारी, रात्री उशिरा हा खळबळजनक घटनाक्रम घडला. मंगेश विठ्ठल भिवटे (राहणार खिरोडा, तालुका संग्रामपूर ) असे मृत युवकाचे नाव आहे.प्राप्त प्राथमिक माहितीनुसार मंगेशला दारूचे व्यसन होते. तो दररोज रात्री दारू पिऊन घरी यायचा. त्यामुळे घरची मंडळी कंटाळली होती. तसेच मोठा भाऊ संदीप विठ्ठल भिवटे यालाही लहान भावाचे असे वागणे पसंत नव्हते.

काल बुधवारी रात्री उशिरा दारु पिऊन घरी का येतो या कारणा वरून दोघा भावामध्ये पुन्हा कडाक्याचा वाद झाला. याचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी मोठा भाऊ असलेल्या संदीप भिवटे याने चुल फुंकण्याच्या लोखंडी फुकणी व फायबरच्या फावडयाच्या दांड्याने मंगेश ला मारहाण केली. यावेळी डोक्यात, तोंडावर पाठीला जबर मार लागल्याने मंगेश गंभीर जखमी झाला.त्याच्या तोंडातून रक्त निघाले आणि तो बेशुद्ध झाला. या अत्यवस्थ स्थितीत नातेवाईकांनी उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेव्दारे शेगाव येथे हलविले. मात्र उपचार दरम्यान मंगेश मृत्यूमुखी पडला.

दरम्यान वैदकीय अहवाल चौकशी अंती संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्यात आरोपी संदिप विठ्ठल भिवटे याच्या विरुध्द कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला बुधवारी रात्री उशिरा आरोपी मोठ्या भावाला (संदीप भिवटे) याला तामगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. पुढील तपास तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेन्द्र पवार करित आहे. होळी सनाच्या तोंडावर झालेल्या या घटनेने खिरोडा गावासह संग्रामपूर तालुक्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

निर्घृण हत्येने हादरला मोताळा तालुका!

धामणगाव बढे येथून जवळच असलेल्या लाल माती फाट्यावर बुधवारी रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान एका इसमाची लोखंडी वस्तूने वार करून हत्या केल्याची घटना घडली. घटनेनंतर आरोपी प्रदीप उर्फ पिंटू कुळे (राहणार पान्हेरा मोताळा तालुका )स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

अनिल प्रल्हाद बावस्कर (वय ४७) राहणार पान्हेरा तालुका मोताळा असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.घटनेची माहिती मिळतात धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेश जायले व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर काल रात्री ११ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.मृतक व्यक्तीचे आई, भाऊ व मुलगा फिर्याद देण्यासाठी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गेले. नातेवाईक व गावकऱ्यांची ठाण्यात गर्दी झाली.