टीप देणारा खबरी हा पोलीसांसाठी महत्त्वाचे काम करीत असतो. त्यावर विसंबून पोलीस अनेक गुन्हे उघडकीस आणतात. मात्र, या घटनेत चक्क पोलीसच सावज ठरले.पोलीस अधीक्षक यांचा खबरी असल्याची बतावणी करीत एका भामट्याने अन्य एका पोलीस अधिकाऱ्यास फोन लावत ऑनलाईन पैसे मागितले. ३१ मार्चची ही घटना होती. रामनगर परिसरात एक मोठा जुगार अड्डा चालत असून त्यासाठी पंटर पाठवून धाड टाकायची असल्याचे सांगत त्याने पैसे मागितले. पोलीस अधिकाऱ्याने त्यास पैसेही लगेच पाठविले. मात्र, त्यानंतर त्याने आपला फोन बंदच करून टाकला.आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यावर या अधिकाऱ्याने रामनगर पोलीसांकडे तक्रार दाखल केली. फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले.पोलीसच फसल्या गेल्याने खाते वेगाने कामाला लागले.
हेही वाचा >>>धक्कादायक… करोनानंतर ‘सिझेरियन’द्वारे प्रसूतीचे प्रमाण वाढले!
सायबर सेलचया माध्यमातून तपास सुरू झाला.आरोपी ठाणे येथील असल्याचे आढळून आले.येथील इंदिरा नगर या आरोपीचे वास्तव्य असलेल्या भागात स्थानिक पोलीसांची मदत घेवून माग काढणे सुरू झाले.पण आरोपी हुलकावणी देण्यातही पटाईत निघाला.चार दिवस त्याचा शोध घेण्यात आल्यानंतर अखेर तो ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरातील रंगोली साडी सेंटरमध्ये सापडला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली. हा योगेंद्र कुमार अतुलभाई सोलंकी नावाचा भामटा चांगलाच अट्टल निघाला. चौकशी केल्यावर त्याने राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांना जुगार अड्डा व विदेशी पिस्तूलच्या नावाखाली थापा मारल्याचे कबूल केले. त्याच्या भ्रमणध्वनीत वेगवेगळ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक आढळून आले. त्याच्याकडे दोन भ्रमणध्वनी संच व रोख तेवीस हजार रुपये सापडले.
या नकली खबरी साठी पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी खास चमू तयार केली होती. झोप उडवून देणाऱ्या नकली खबऱ्यास ताब्यात घेतले तेव्हाच पोलीसांनी सुटकेचा निःश्वास टाकला.