दारूची तलफ आली अन् दारू मिळाली नाही तर तळीराम कुठल्या थराला जातोय याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात आला. दारू प्यायला पैसे नसल्याने नातवाने आजीकडे पैशाचा तगादा लावला. आजीने पैसे देण्यास नकार दिला. आजीच्या कानातील सोन्याच्या दागिन्यावर नातवाचे लक्ष गेले. तो दागिना काढण्यासाठी नातवाने आजीचा कानच तोडला. ही घटना वर्षभरापूर्वी गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या अडेगावात घडली. याप्रकरणी गोंडपिपरी न्यायालयाने नुकताच निकाल दिला. न्यायालयाने नातवला दोन वर्षाची शिक्षा आणि पाच हजाराचा दंड ठोठावला आहे. राहुल देठे असे नातवाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच शिंदे गटाचं बंड”; सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या…”

राहुल देठे (३५) हा गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील रहिवाशी आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. आधीच दारू पिऊन असताना पुन्हा त्याला दारू पिण्याची तलफ आली. पण खिशात पैसे नव्हते. अशावेळी तो आजी बुधाबाई रायपुरे (८०) यांच्या घरी गेला. दारूसाठी पैशांची मागणी केली. पण पैसे देण्यास आजीने नकार दिला. यामुळे संतापलेल्या राहुलने जबरदस्तीने आजीच्या कानातील सोन्याची बिरी काढली व पळ काढला. या घटनेत आजीचा कानच तुटला व त्या गंभीर जखमी झाल्या. मागील वर्षी हा प्रकार घडला होता. आजीने या प्रकाराची तक्रार गोंडपिपरी पोलिसात दाखल केली. पोलिसांनी कलम ३२७ अन्वये राहुलवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गोंडपिपरीच्या न्यायालयाने नुकताच निकाल दिला. आरोपी राहुलला दोन वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला. सरकारी वकील म्हणून ॲड. राजेश धात्रक यांनी कामकाज सांभाळले.

हेही वाचा >>> र्धा : वैद्यकीय क्षेत्रातील आश्चर्य! रक्तगट वेगवेगळे असुनही आईच्या किडनीचे मुलामध्ये प्रत्यारोपण यशस्वी

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली होती. मात्र. दारूबंदीतही तालुक्यात दारूचा महापूर सुरूच होता. मोठी किंमत अदा करून तळीराम आपली तहान भागवत होते. आता दारू सुरू झाली आहे. अल्प दरात दारू मिळतेय. मात्र, दारूबंदी उठल्यानंतरही असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गोंडपिपरी तालुक्यात व्यसनमुक्ती संघटनांचे काम जोरात सुरू असले तरी दारूच्या व्यसनाच्या आहारी अनेक तरुण गेल्याचे धक्कादायक चित्र आहे. दारू, गांजा यांचे व्यसन लागलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. अशात न्यायालयाने दिलेली ही शिक्षा तळीरामांना विचार करायला लावणारी ठरली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man get two year jail for breaking grandmother s ear to remove gold ornament rsj 74 zws