नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना सक्कदरा पोलीस ठाण्यांतर्गत मोठा ताजबाग परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. सलमान खान सरदार खान (२२) रा. अवलियानगर, मोठा ताजबाग असे आरोपीचे नाव आहे.
पीडित २३ वर्षीय मुलगी आणि आरोपी हे एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यावेळी दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले व आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. आता तिच्याशी विवाह करण्यास त्याने नकार दिला आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक मनीष हिवरकर यांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.
तरुणीचा विनयभंग
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिर परिसरात वाहन उभे करण्यावरून वाद झाला. त्यातून दोघांनी तरुणीला शिवीगाळ करून विनयभंग केला. शुभमसिंह आणि संजयसिंह अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबत इतर आरोपीही असण्याची शक्यता आहे.
देहव्यापार करणाऱ्या एका महिलेला अटक
हॉटेल रेडिशन ब्ल्यू येथील देहव्यापार प्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुन्हा एका महिलेला अटक केली आहे. ममता राजू सोनवाल (४०) रा. प्रतापनगर, सांगनेर, जयपूर असे आरोपी महिलेचे नाव आहे.
ममता ही राजस्थानातील असून तिने नागपुरातील पुजरा राव ऊर्फ माया हिच्याकडे पीडित तरुणीला देहव्यापारासाठी पाठवले होते.७ जानेवारीला रात्री माया हिच्याशी तडजोड करून पोलिसांचा एक पंटर रेडिशन ब्ल्यूमध्ये गेला होता. त्या ठिकाणी खोली क्रमांक २०२ मध्ये एक तरुणी देहव्यापारासाठी उपलब्ध होती. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनात कारवाई करून पीडित मुलीची सुटका करण्यात आली, तर माया हिला अटक झाली होती. मायाची कसून चौकशी केली असता तिचे संबंध राजस्थानातील ममताशी असल्याचे उघड झाले.