लोकसत्ता टीम
अमरावती : मुलाने वडिलांची डोक्यावर लोखंडी बत्त्याने वार करून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भामोद येथे मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली.
रामकृष्ण सदाशिव कात्रे (६५) रा. भामोद असे मृत व्यक्तीचे तर अतुल रामकृष्ण कात्रे (३७) रा. भामोद असे आरोपी मुलाचे नाव आहे. रामकृष्ण यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून दोन्ही मुलींच्या लग्नानंतर ते मुलगा व सूनेसोबत राहत होते. मुलगा अतुल व सून योग्यरित्या सांभाळ करीत नसल्याने ते कधीकधी मंदिरात किंवा परिसरातील नातेवाइकांकडे राहायला जात होते. याबाबत ते गावात व नातेवाईकांना सांगत होते. त्याचा राग मुलगा अतुलच्या मनात होता. सोमवारी अतुलने बऱ्याच दिवसानंतर वडील रामकृष्ण यांना घरी आणले होते.
आणखी वाचा-हलबा समाजाला डावलणाऱ्यांविरोधात मतदान, ‘या’ फलकाने वाढवले सर्व पक्षांचे टेन्शन…
रात्री शेतावर राखणदारी करुन घरी परतल्यावर अतुलने वडील रामकृष्ण यांना गावात आपल्याबद्दल केलेल्या बदनामीबाबत जाब विचारला. त्यावरुन त्यांच्यात वाद उद्भवला. या वादात अतुलने वडील रामकृष्ण यांच्या डोक्यावर लोखंडी बत्त्याने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने आपल्याला काहीही माहित नसल्याचा बनाव केला. या घटनेने भामोद येथे खळबळ उडाली.
दरम्यान, मंगळवारी ही घटना उजेडात आल्यावर नागरिकांनी येवदा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी मृतक रामकृष्ण यांची मुलगी मयुरी पंकज नागे (३२) रा. चिंचोली शिंगणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास आरंभला. पोलिसांनी सर्वप्रथम अतुलची चौकशी केली. त्यावर त्याने आपल्याला काहीही माहित नसून घटनेच्या वेळी आपण शेतात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी रामकृष्ण यांच्या मुलींची विचारपूस केली. त्यावर त्यांनी भाऊ अतुलवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी अतुलची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
आणखी वाचा-रवी राणांच्या नव्या दाव्यामुळे भाजपचा एक गट पुन्हा अस्वस्थ
त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण वानखडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख व सचिन पवार, त्र्यंबक मनोहर, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, युवराज मानमोठे, रवींद्र वऱ्हाडे, सागर नाठे, श्याम सोनोने यांनी केली. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.