लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : घरातून बहिण बेपत्ता झाल्यामुळे आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाने स्वत:च्या पोटात चाकू भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्र असलेल्या भावंडांनी त्या युवकाला वाचविण्यासाठी धडपड केली. झटापटीत युवकाच्या हातातील चाकू एका मित्राच्या डोक्याला लागला तर दुसऱ्याच्या गळ्यात खूपसल्या गेला. त्यात एका मित्राचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. रोहित खारवे (२४) असे आरोपीचे नाव आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत विहिरगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. शुभम करवडे (२५) असे मृतकाचे तर मनिष करवडे (२७) जखमीचे नाव आहे.
विहिरगाव परिसरात पर्ल हेरीटेल बंगल्यात फिर्यादी मनीष करवडे हा आई आणि भाऊ शुभम सोबत राहतो. मनिषचा मित्र आरोपी रोहित (रा. प्रेमनगर)हा सुध्दा मागील काही दिवसांपासून त्यांच्या घरी राहत होता. रोहितची लहान बहिण सात दिवसांपासून तिच्या राहते घरून बेपत्ता आहे. नातेवाईक, मैत्रीणींकडे तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. तिचा शोध सुरूच होता. परंतू बहिण मिळत नसल्याने भाऊ रोहित हा तणावात होता.
आणखी वाचा-मुलीने अर्धनग्नावस्थेत जंगलातून काढला पळ… बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अटक
गुरूवार २५ जानेवारीच्या रात्री प्रेमनगर येथील त्याच्या घरी गेला. तेथून १०.४५ वाजेच्या सुमारास मित्राच्या घरी परतला. यावेळी मनिषची आई बाहेरगावी गेली होती. घरात केवळ मनीष आणि शुभम हे दोघेच भाऊ होते. बहिण मिळत नसल्याने रोहितचा तणाव वाढत होता तसेच बहिण बेपत्ता होण्यासाठी तो स्वत:ला दोषी मानत होता. रोहितचा वाढता तणाव पाहून मित्र मनीष आणि भाऊ शुभम दोघेही त्याला समजावित होते. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने स्वत:ला संपविण्याच्या उद्देशाने किचनमधून भाजी कापण्याचा चाकू आणला, स्वत:ला मारण्याचा प्रयत्न करीत असताना मनिष व शुभम दोघांनीही त्याला रोखण्याचा प्रयत्न करीत होते.
आणखी वाचा-नागपूर : दीडशेवर बुलेटचालकांना लावले ‘फटाके’
याच झटापटीत रोहितने मनिषला जोरदार धक्का दिल्याने तो भिंतीवर आदळला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यानंतरही रोहित स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न करीतच होता. यानंतर शुभमने रोखण्याचा प्रयत्न करीत त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेत असताना झालेल्या झटापटीत शुभमच्या गळ्यावर चाकू खुपसल्या गेला. शुभम रक्तबंबाळ झाला. लगेच मनीष व आरोपी रोहित या दोघांनी शुभमला मेडिकल रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तसेच मनिषच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याला मेडिकल रूग्णालयात दाखल करण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी रोहित विरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली आहे.