लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा : दारू पिऊन आईला शिवीगाळ, मारहाण, या लहान भावाच्या कृत्यांमुळे वैतागलेल्या आणि आईचे हाल न पाहवल्यामुळे मोठ्या भावानेच लहान भावाची हत्या केल्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे. त्याने सुपारी देऊन लहान भावाला संपवले. लाखनी येथील खेडेपार मार्गावर रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून येताच खळबळ उडाली. अखेर त्याच्या हत्येचे गूढ उलगडले असून याप्रकरणी लाखनी पोलिसांनी मोठ्या भावासह तिघांना बेड्या ठोकल्या.

आकाश भोयर (३१) असे मृताचे नाव असून त्याचा मोठा भाऊ राहुल भोयर (३३) यानेच त्याच्या हत्येची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी राहुल याच्यासह सुभेंद्र उर्फ मोनू न्यायमूर्ती (२७) आणि कार्तिक मांढरे (२४) या दोघांनाही अटक केली.

आणखी वाचा-भंडारा : मित्रानेच केला घात! ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ४३ लाखांनी फसवणूक

मृत आकाश आणि त्याचा भाऊ राहुल हे दोघेही लाखनी शहरानजीक असलेल्या सावरी येथील वडिलोपार्जित घरात रहायचे. आकाशला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत घरी येऊन म्हाताऱ्या आईला शिवीगाळ करायचा, अनेकदा मारहाणही करायचा. एवढेच नव्हे तर शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही त्रास द्यायचा. राहुलने त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो काही सुधारत नव्हता. अखेर राहुलने आकाशला संपवण्याची योजना आखली. राहुलने त्याचा मित्र मोनू न्यायमूर्ती आणि कार्तिक मांढरे यांना सुपारी दिली. या दोघांनी आकाशला दारू पाजून लाखनी शहराजवळ असलेल्या खेडेपार मार्गावर नेले. तिथेच त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी त्याला दूर अंतरावर फरपटत नेऊन तिथेच त्याचा मृतदेह फेकला.

आणखी वाचा-५ वाघांचे एकत्र दर्शन, नागझिरा अभयारण्यातील पर्यटकांमध्ये आनंदाची लाट

पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. संशयाच्या आधारे लाखनी पोलिसांनी मृताचा मोठा भाऊ राहुलला ताब्यात घेतले. तेव्हा घाबरून त्यानेच भावाच्या हत्येची सुपारी दिल्याचे कबूल केले. या आधारावर पोलिसांनी त्याचे इतर दोन साथीदार सुभेंद्र आणि कार्तिक यांनाही ताब्यात घेत तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man killed his younger brother because he was troubling mother by drunk ksn 82 mrj